Lok Sabha Election 2019 राजू शेट्टी चोरांच्या गुहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 01:06 AM2019-04-11T01:06:11+5:302019-04-11T01:06:11+5:30
समीर देशपांडे/प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चळवळीपेक्षा केवळ आणि केवळ माझी खासदारकीची खुर्ची वाचली पाहिजे, याच ...
समीर देशपांडे/प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चळवळीपेक्षा केवळ आणि केवळ माझी खासदारकीची खुर्ची वाचली पाहिजे, याच स्वार्थी भूमिकेतून राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. ते ज्यांना दरोडेखोर आणि अलिबाबा आणि चाळीस चोरांची टोळी म्हणत होते,
त्याच गुहेत ते शिरले असल्याचा
आरोप शिवसेना-भाजप महायुतीचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ला बुधवारी दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी शेट्टी यांच्यावर चौफेर हल्ला चढविला.
...तर तुम्ही ‘वंचित आघाडी’मध्ये का गेला नाही ?
तुम्ही आधी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अब्रू वेशीवर टांगलीत. त्यांना शिव्या देत-देत महायुतीमध्ये प्रवेश केला; परंतु खरोखरच तुमची भूमिका नेक होती तर तुम्ही या दोन्ही युती, आघाडीला बाजूला ठेवत वंचित आघाडीमध्ये का गेला नाहीत ? प्रकाश आंबेडकरांनीच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले की, मी शेट्टी यांना निमंत्रण दिले होते. मात्र ‘मला काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय निवडून येता येणार नाही,’ असे शेट्टी म्हणाले. म्हणजेच तुम्हाला केवळ तुमच्या खासदारकीसाठी कुठला तरी एखाद-दुसरा पक्ष बरोबर पाहिजे. बाकी काही नाही.
प्रश्न : देशातील शेतकऱ्यांचे संघटन करणाºया राजू शेट्टींबाबत तुमचे मत काय ?
उत्तर : अगदी खरंय. ते देशातील संघटन करण्यासाठी गेली काही वर्षे देशभर फिरत आहेत; परंतु ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले आहे, त्या गावागावांतील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना त्यामुळे वेळ मिळाला नाही, हे वास्तव आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेतच; परंतु त्याबरोबरच गावगाडा चालवताना येणाºया अडचणी, सोई, सुविधा, पाणी योजना, रस्ते ही विकासकामे मार्गी कोण लावणार? परंतु गेल्या दहा वर्षांत या विकासकामांकडे दुर्लक्ष
झाल्याने जनता संतप्त असल्याचे आता गावोगावी गेल्यावर दिसून येत आहे.
प्रश्न : गेल्यावेळी महायुतीमधील शेट्टी आता महाआघाडीमध्ये गेलेत. तुमचे मत काय ?
उत्तर : सुरुवातीला शेट्टी यांनी ‘रिडालोस’तर्फे निवडणूक लढविली. त्यांच्यानंतर कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ऊठसूठ पंचनामा करीत त्यांनी शिवसेना-भाजप युतीमध्ये प्रवेश मिळवला; परंतु त्यांचे राजकारण हे नकारात्मक आहे. त्यामुळे कायम आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी त्यांना दुसºयावर टीका करावी लागते. महायुतीत असतानाही ते आपल्याच नेत्यांवर टीका करीत होते; म्हणून त्यांना आज कॉँगे्रस आघाडीचा आसरा घ्यावा लागला. ते अपक्ष उभे राहिले असते तर त्यांची नैतिकता शाबूत आहे असे म्हणता आले असते. परंतु शेतकºयांच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडे घालणाºया कारखानदारांच्या नादाला लागू नका, असे सांगणारे शेट्टीच त्यांच्या मांडीला मांडी लावून मतांसाठी लाचारी पत्करताना सर्वसामान्य जनता बघत आहे. ही सुज्ञ जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.
प्रश्न : राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबत तुमचे मत काय ?
उत्तर : मुळात शेट्टी यांनी महायुतीमध्ये सहभागी होऊन सुरुवातीच्या काळात जे लाभ घ्यायचे ते घेतले आहेत. अनेक सरकारी योजनांची अनुदाने उचलण्यापासून ते पेट्रोल पंपापर्यंत आणि सहकारी संस्थांपासून ते कृषिसंस्थांपर्यंत अनेक संस्था मंजूर करून घेतल्या. हे कुणाकुणाच्या नावावर आहे हे पाहावे लागेल. हीच त्यांची विकासकामे. अन्यथा त्यांनी मतदारसंघामध्ये कोणता प्रकल्प आणला ? कुठली प्रभावी योजना आणली ते त्यांनी जाहीर करावे.
प्रश्न : मतदारसंघात तुम्हाला प्रतिसाद कसा आहे ?
उत्तर : गावोगावी, जागोजागी उत्तम प्रतिसाद आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. बाळासाहेब माने यांचा नातू म्हणून त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी बहुजन जनता माझ्यामागे उभी आहे. माझ्यासारख्या युवकाला बळ देण्यासाठी अनेक अदृश्य शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्याच मला विजयापर्यंत पोहोचवतील, यामध्ये मला शंका नाही.