कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
By विश्वास पाटील | Published: April 30, 2024 08:12 AM2024-04-30T08:12:30+5:302024-04-30T08:13:04+5:30
कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात छत्रपती घराण्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे महायुतीने ‘मान गादीला.. मत मोदींना’ अशा प्रचारावर भर दिला आहे .
विश्वास पाटील
कोल्हापूर : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार भलेही २३ रिंगणात असले, तरी शिंदेसेनेचे खासदार संजय मंडलिक व काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यातच दुरंगी काटाजोड लढत होत आहे.
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात छत्रपती घराण्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे महायुतीने ‘मान गादीला.. मत मोदींना’ अशा प्रचारावर भर दिला आहे, तर महाविकास आघाडी ‘मान गादीला आणि मतही गादीला’च अशी मोहीम सुरू केली आहे. दोन्ही आघाड्यांचे नेते विजयासाठी झटत आहेत; परंतु विधानसभेला तुमचे बघू, आता लोकसभेला काय करायचे ते आमचं आम्ही ठरवू, अशी बंडखोर भूमिका घेऊन नेत्यांच्या हातातून सुटलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरच या मतदारसंघाचा गुलाल ठरणार आहे.
प्रचारात गाजत असलेले मुद्दे
दलबदलूपणा कोल्हापूरच्या जनतेला कधीच आवडत नाही. गतवेळची निवडणूक त्याभोवतीच फिरली. यंदाही तो मुद्दा केंद्रस्थानी.
खासदार संजय मंडलिक यांनी निवडून आल्यावर आपल्या मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याच्या नागरिकांच्या तक्रारी.
शाहू छत्रपती यांच्या दत्तकविधी-बद्दल उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची डमी उमेदवार म्हणून संभावना.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, प्रकाश आबिटकर यांच्यावर मंडलिक यांच्या विजयाची जबाबदारी आहे. मंडलिक यांच्या निकालावर मुश्रीफ यांचे विधानसभेचे राजकारणही अवलंबून आहे. या नेत्यांनी अंतर्विरोध बाजूला ठेवून मंडलिक यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.
मविआत आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील, व्ही. बी. पाटील यांच्यासह उद्धवसेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी निवडणूक अंगावर घेतली आहे.
कुणाकडे किती पाठबळ ?
काँग्रेसकडून पहिल्याच यादीत शाहू छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांना सुरुवातीचा अवधी प्रचारासाठी मिळाला. याउलट मंडलिक यांना उमेदवारीसाठीही झगडावे लागले. आता दोघांनीही प्रचाराचे रान उठविले आहे.
चुरशीची लढत असल्याने महायुतीने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघात काँग्रेसकडे पाच आमदारांचे बळ आहे. महायुतीकडे तीन आमदार आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
अनेक वर्षांत एकही मोठा नव्या प्रकारचा उद्योग आला नाही. फौंड्री, फोर्जिंग, टूल मेकिंगवरच गुजराण. इलेक्ट्रॉनिक्समधील उद्योगाची गरज.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे सर्वच पक्षांकडून कमालीचे दुर्लक्ष. नुसते आराखडे करण्यातच अनेक वर्षे गेली. त्याचा पाठपुरावा नाही.
वाढते शहरीकरण; परंतु पायाभूत सुविधांची वानवा, कोल्हापूरची हद्दवाढ नको म्हणून प्राधिकरण केले; परंतु ते बांधकाम परवानगी देण्यापलीकडे काही करीत नाही.
साखर, गूळ, दुग्ध व्यवसाय हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा; परंतु त्याचा अभ्यास करणारी राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील संशोधन संस्था आणण्याचे प्रयत्न नाहीत.
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष टक्के
२०१४ धनंजय महाडिक राष्ट्रवादी ४८.१९%
२००९ सदाशिवराव मंडलिक अपक्ष ४१.६५%
२००४ सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी ४९.४२%
१९९९ सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी ४६.३३%
१९९८ सदाशिवराव मंडलिक काँग्रेस ५१.६६%