लोकसभा 2024: राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता; आज-उद्या निर्णय होणार!
By विश्वास पाटील | Published: March 28, 2024 09:21 AM2024-03-28T09:21:37+5:302024-03-28T09:23:10+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असल्याची चर्चा
विश्वास पाटील, कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व लोकसभेचे उमेदवार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव आहे. आज,उद्या कार्यकर्त्यांशी बोलून त्यासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे. जिंकण्यासाठी भाजप कुठल्याही स्तराला जात असेल तर आपण आघाडीसोबत गेले तर बिघडले कुठे अशीही विचारणा कांही कार्यकर्त्यांतून केली जात आहे.
शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांतही पाठिंब्यावरून दोन मतप्रवाह आहेत. बांधावरील शेतकरी आपल्या पाठिशी असल्याने एकला चलो रे.. हीच भूमिका घेवून पुढे जावे असे कांहीना वाटते. तर महाविकास आघाडीचा पाठिंबा घेवून निवडणूक लढवावी असेही कांहीचे म्हणणे आहे. या मतदार संघात महायुतीकडून अजूनही खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. उमेदवार तेच राहतात की भाजपकडून शौमिका महाडिक यांना रिंगणात उतरवले जाते ही शक्यताही बळावली आहे. अशा स्थितीत या मतदारसंघात तिरंगी लढत झाल्यास शेट्टी यांच्या अडचणी वाढू शकतात. महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाकडे गेली आहे. त्यांचा शेट्टी यांना पाठिंबा आहे परंतू शेट्टी महाविकास आघाडीत येत नसतील तर शिवसेनेने आपला उमेदवार या मतदारसंघातून द्यावा असाही मतप्रवाह बळावला आहे. काँग्रेस एकदिलाने शेट्टी यांच्यासोबत आहे परंतू राष्ट्रवादी व शिवसेनेतूनच दबाव वाढला आहे. त्यामुळे एकला चलो रेच्या भूमिकेचा फेरविचार करण्याची पाळी संघटनेवर आली आहे.
- दोन्ही काँग्रेसची ताकद महत्वाची
शिवसेनेच्या पाठिंब्याइतकीच महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसची ताकदही महत्वाची आहे. कारण सहापैकी तीन आमदार या दोन पक्षाचे आहेत. गेल्या निवडणूकीत शेट्टी साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याची टीका झाली आणि त्याचा त्यांना फटका बसला ही बाब खरी असली तरी साखर कारखानदारीचे वर्चस्व असलेल्या शिरोळ, वाळवा आणि शिराळा या विधानसभा मतदारसंघानीच त्यांना ४६ हजार ६४० चे मताधिक्क्य दिले आहे. आणि एकदा गाजलेला मुद्दा परतच्या निवडणूकीत फारसा चालत नाही.
- वैचारिक द्रोह नाही..
शेट्टी यांची २०१६ पासून भाजप व मोदी यांच्या राजकारणाला विरोध हीच राजकीय भूमिका राहिली आहे. महाविकास आघाडीचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी आपल्या मुळ भूमिकेला सोडचिठ्ठी देवून वैचारिक द्रोह केला असेही कांही होत नाही. महाविकास आघाडीने पाठिंबा दिल्याने स्वाभिमानीचीही अन्य मतदारसंघातील ताकद या आघाडीला फायदेशीर ठरू शकते.