संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचीच अखेर बाजी; मुंबईतून झाली घोषणा, कार्यकर्त्यांचा जल्लोष
By समीर देशपांडे | Published: March 28, 2024 07:40 PM2024-03-28T19:40:04+5:302024-03-28T19:42:31+5:30
लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून मंडलिक आणि माने यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले हाेते. सर्वेक्षणाच्या आधारे मंडलिक यांच्याऐवजी भाजपचे समरजित घाटगे यांचे नाव पुढे आणले गेले.
कोल्हापूर : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला महायुतीच्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा गुंता सुटला असून अखेर शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरातून खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघातून खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी गुरूवारी संध्याकाळी मुंबईतून जाहीर करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून मंडलिक आणि माने यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले हाेते. सर्वेक्षणाच्या आधारे मंडलिक यांच्याऐवजी भाजपचे समरजित घाटगे यांचे नाव पुढे आणले गेले. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचेही नाव चर्चेत आले होते. तर हातकणंगलेमधून आमदार विनय कोरे आणि शौमिका महाडिक यांची नावे चर्चेत आली. परंतू शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडलिक आणि माने यांच्यासाठी धरलेला आग्रह सोडला नाही. शिंदे गटासोबत राहिलेल्या सर्वच खासदारांनी कोणत्याही परिस्थितीत तुम्ही उमेदवारीचा दिलेला शब्द पाळला पाहिजे असा आग्रह धरल्यामुळे शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्याने मंडलिक आणि माने यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली.
मंडलिक तिसऱ्यांदा रिंगणात
संजय मंडलिक हे यावेळी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरत आहेत. त्यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे १९९८,१९९९, २००४ आणि २००९ या निवडणुकांमध्ये चार वेळा विजयी झाले. २००९ साली त्यांनी अपक्ष उभे रहात राष्ट्रवादीचे संभाजीराजे यांचा पराभव केला होता. यानंतर २०१४ मध्ये संजय मंडलिक यांचा धनंजय महाडिक यांनी पराभव केला तर २०१९ मध्ये मंडलिक यांनी महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.
माने दुसऱ्यांदा रिंगणात
धैर्यशील माने हे दुसऱ्यांना रिंगणात उतरत आहेत. त्यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब माने पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनी पाच वेळा लोकसभा लढवली. त्यात तीनवेळा त्या पराभूत झाल्या तर दोन वेळा विजयी झाल्या. २०१४ ची निवडणूक आवाडे शेट्टी यांच्यात झाली होती. पुन्हा २०१९ ला धैर्यशील माने रिंगणात आले आणि त्यांनी शेट्टी यांचा पराभव केला.
मुश्रीफ, महाडिक यांच्यावरच जबाबदारी
महायुतीचे जिल्ह्याचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते खासदार धनंजय महाडिक यांच्यावर मंडलिक आणि माने यांच्या प्रचाराची प्रामुख्याने धुरा राहणार आहे. जोडण्या घालण्यात हे दोन्ही नेते कार्यक्षम आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य, ताराराणी पक्षासह अन्य मित्रपक्षांचे नेते आणि पदाधिकारी यांना एकत्र आणत, समन्वय साधत प्रचाराची जबाबदारी यांना पेलावी लागणार आहे.