‘२३ मे’च्या मुहूर्ताला लोकसभा निकालाचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:27 AM2019-04-26T00:27:56+5:302019-04-26T00:28:00+5:30
रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता नागरिकांना निकालाची उत्सुकता ...
रमेश पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता नागरिकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. निकालाबाबत अनेक ठिकाणी पैजा लागल्याचे पाहावयास मिळत आहे. गावागावातल्या पारावर, तर शहरातल्या चौकाचौकांमध्ये आणि पेठांमध्ये सुध्या याचीच चर्चा सुरू आहे. मात्र, निकालासाठी २३ मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता ताणली आहे, पण या २३ मे ला निकालानंतर उमेदवाराचा व कार्यकर्त्यांचा संभाव्य जल्लोष, तणावाचा विचार करून अनेकांनी २३ मे च्या लग्नमुहूर्ताकडे कानाडोळा करणे पसंत केले आहे.
ज्यांची लग्ने ठरलेली आहेत अशा अनेक विवाह इच्छुकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी २३ मे या दिवशी असणाऱ्या लग्नाच्या मुहूर्ताकडे दुर्लक्ष केले असल्याचे वास्तव समोर आले आहे. निवडणुकीच्या निकालाचा, त्या दिवशी रस्त्यावर येणाºया प्रचंड वाहनांच्या गोंगाटाचा, ट्रॅफिक जामच्या अडथळ्याचा व या सर्व गोष्टींमुळे पै-पाहुण्यांना कार्यालयापर्यंत कदाचित वेळेत पोहोचण्यास विलंब होण्याच्या शक्यतेमुळे या दिवशीच्या लग्न मुहूर्ताकडे विवाह ठरलेल्या अनेक इच्छुकांनी पाठ फिरवली आहे. या दिवसाच्या मुहूर्ताला वगळून इतर दिवशी असलेल्या विवाह मुहूर्ताला काहींनी पसंती आहे.
मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत लग्नाचा धुमधडाका असतो. एखाद्याच्या घरी लग्न ठरल्यानंतर सर्वात प्रथम लग्नाचा मुहूर्त बघितला जातो. तसेच त्यानंतर लगेचच आपल्या घरापासून जवळ असणारे, खिशाला परवडणारे व सर्व सोयींनीयुक्त असे मंगल कार्यालय बुक केले जाते. काही वेळा ठरलेल्या मुहूर्तावर कार्यालय उपलब्ध न झाल्याने मुहूर्ताची तारीख बदलली जाते. पण २३ मे या तारखेला लग्नाचे मुहूर्त असूनही केवळ निवडणुकीच्या निकालामुळे अनेकांनी या तारखेला पसंती दिलेली नाही.
गुरुवारी, २३ मे रोजी, सकाळी ९.५७, १०.४२, दु.१२.३६, सायंकाळी ०४.०५, तर गोरज ०७.०९, ०७.२१ असे एकूण ७ मुहूर्त आहेत. पण, पर्यायच नसल्याने यातील काही मुहूर्तावर अगदी कमी प्रमाणात काहींचे विवाह होणार असल्याने या तारखेला काही मंगल कार्यालयाचे बुकिंग झाले आहे.
या निवडणुकीच्या निकालामुळे उत्साही कार्यकर्त्यांच्या जल्लोषाचा व पराभूत उमेदवाराच्या नाराज कार्यकर्त्यांच्या नाराजीचाही आपल्या समारंभावर प्रभाव पडू नये अशी काहींची इच्छा आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून निकालामुळे मंगल कार्यालय, मंडप डेकोरेशनवाले, भांडी साहित्य भाड्याने देणारे व्यावसायिक, लहान-मोठे बँडवाले, आदींच्या व्यवसायावर कमी-जास्त प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.