लोकमत अॅस्पायर एज्युकेशन प्रदर्शन उद्यापासून
By admin | Published: June 2, 2017 01:14 AM2017-06-02T01:14:29+5:302017-06-02T01:14:29+5:30
लोकमत अॅस्पायर एज्युकेशन प्रदर्शन उद्यापासून
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील करिअर, शिक्षणाविषयीच्या शंकांचे निरसन करणाऱ्या व योग्य मार्ग निवडण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला उद्या, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनात केवळ कोल्हापूरच्याच नव्हे तर पुणे, मुंबई, मदुराईसह सांगली, सातारा, रत्नागिरीतील शैक्षणिक संस्थाही सहभागी झाल्याने ‘एकाच छताखाली सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती’ उपलब्ध होणार आहे.
राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे ३ ते ५ जूनदरम्यान सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत होणाऱ्या या प्रदर्शनास ‘द युनिक अकॅडमी’चे प्रायोजकत्व लाभले आहे. हे केवळ प्रदर्शन असणार नाही तर त्यात पालक आणि विद्यार्थ्यांमधील करिअरविषयीचा असणारा संभ्रम दूर होणार आहे. त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ‘एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना’ उपलब्ध होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. या प्रदर्शनात शैक्षणिक संस्थांच्या माहितीसह मुलांच्या व्यक्तिमत्त्व कौशल्याचा विकास, बुद्धिमत्ता विकासाला चालना देणाऱ्या विविध स्पर्धा, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन आणि चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे तसेच ‘सायन्स अॅन्ड मॅथ्स पंडित’, ‘एज्युकेशन आयडॉल’ अशा विविध स्पर्धा होणार आहेत. याशिवाय ‘सेल्फी विथ मार्कशीट’, प्रदर्शनास भेट देणाऱ्या आणि सेमिनारमध्ये सर्वोत्तम प्रश्न विचारणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सेमिनारमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याला व पालकांना लकी ड्रॉअंतर्गत प्रत्येक तासाला बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यात आठ जीबीचा पेनड्राईव्ह, एक पिझ्झा कुपन, परफ्युम, कुटुंबासाठी फॅमिली डिनरचे कुपन यांचा समावेश आहे. त्याला पिझ्झा हट, विप्रास टेक्नोमार्ट, पूजा ट्रेडर्स, पार्थ आॅप्टिक्स व हॉटेल वेलची यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
सेल्फी विथ मार्कशीट
आपल्या शैक्षणिक कालावधीतील कोणत्याही वर्गाचे मिळालेले सर्टिफिकेट किंवा मार्कशीटसोबत प्रदर्शनाच्या ठिकाणी तुम्ही ‘सेल्फी’ काढू शकता. येथे स्वतंत्र सेल्फी वॉल असून त्यासाठी खास पोशाखही असणार आहे. दररोज उत्कृष्ट सेल्फी काढलेल्या एका विद्यार्थ्याला आणि एका विद्यार्थिनीला ‘बेस्ट सेल्फी’चे बक्षीस मिळणार आहे.