‘लोकमत’ संवादसत्र : सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व्यावसायिक, व्यापाऱ्यांचा सूर
By admin | Published: November 6, 2014 10:52 PM2014-11-06T22:52:50+5:302014-11-06T22:59:02+5:30
दर्जात्मक वस्तूंकडे ग्राहकांचा कल अधिक
अविनाश कोळी/ अंजर अथणीकर/नरेंद्र रानडे-- सांगली
स्पर्धा वाढीस लागल्यानंतर ग्राहकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. तरीही स्वस्तातील वस्तूंपेक्षा दर्जात्मक वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक वाढला आहे. त्यांच्यातील सतर्कता, चोखंदळपणा आणि निरीक्षणवृत्ती पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. दुसरीकडे स्पर्धेचा परिणाम बाजारपेठांवरही झाला आहे. व्यावसायिक तसेच व्यापारी वर्गाला आता जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख होऊन सेवाभावी वृत्ती वाढवावी लागत आहे, असा सूर ‘लोकमत’ संवाद सत्रात विविध मान्यवरांनी व्यक्त केला.
सांगलीतील एसएफसी मेगा मॉलमध्ये ‘लोकमत’च्यावतीने ‘ग्राहकांचा कल आणि बदलती बाजारपेठ’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला
होता. यामध्ये सांगलीतील ‘देवपूजा’ या संस्थेचे विक्री अधिकारी प्रफुल्ल मुगळखोड, लक्ष्मी एंटरप्रायझेसचे संचालक प्रकाश हुलवान, सुनील बेलेकर, तृप्ती एंटरप्रायझेसचे राजूभाई ठक्कर, सूर्यवंशी कन्स्ट्रक्शनचे अमित सावंत, साधुराम ट्रॅक्टरचे
पांडुरंग बसुगडे, मिक्स अॅण्ड मॅच शोरुमचे सुनील चव्हाण, स्कायलाईन कॉम्प्युटर्सचे सुहास बाबर, सिध्दिविनायक हिरो शोरुमचे
श्रीकांत तारळेकर, अनिता सुपर शॉपीचे संजय शिंदे आणि णमो ट्रॅक्टर्सचे जयकुमार बाफना सहभागी झाले होते.
या परिसंवादात पूर्वीची बाजारपेठ, त्यामधील ग्राहक, व्यावसायिकांची, व्यापाऱ्यांची भूमिका, त्यांच्या मर्यादा
आणि आताच्या बाजारपेठांशी व ग्राहक-व्यापारी वर्गातील नातेसंबंधांवर तुलनात्मक चर्चा पार पडली. आता प्रत्येक व्यापारी, व्यावसायिक ग्राहकांशी नाते जोडण्याचा प्रयत्न करीत आहेच, शिवाय ग्राहकसुद्धा विश्वासू व्यावसायिक व दुकानदार शोधत असल्याचे चित्र आहे. दोघांनाही एकमेकांच्या अपेक्षांच्या आधाराची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच बाजारपेठेचे स्वरुप बदलत चालल्याचे मत व्यक्त केले. सध्या दर्जाच्याबाबतीतही ग्राहक अधिक सतर्क आणि चोखंदळ झाला आहे. त्यासाठी जादा पैसे मोजण्यासही ग्राहक तयार आहेत. प्रकृतीची काळजी घेत, सुरक्षित वस्तू खरेदी करण्याकडे त्यांचा कल वाढलेला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कोण काय म्हणाले...
आटपाडी, जत तालुक्यांच्या टोकापर्यंत अजूनही ट्रॅक्टरची गरज आणि त्याचा उपयोग काय आहे हे पोहोचलेले नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटिंगची गरज आहे. यापुढील काळात घरटी ट्रॅक्टर होईल असे मला वाटते. बैलांचा वापर हळूहळू आता कमी होऊ लागला आहे. बैलांच्या तुलनेत ट्रॅक्टर वापराचा खर्च कमी आहे. लहान शेतकरीही आता ट्रॅक्टर बाळगू शकेल, इतक्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. आगामी काळात ट्रॅक्टरच्या किमती कमी होतील. सध्या ३० ते ९० एचपीच्या ट्रॅक्टर्सची विक्री सुरु आहे. शेती आणि वाहतुकीसाठी ट्रॅक्टरना मागणी आहे.
- पांडुरंग बसुगडे, साधुराम ट्रॅक्ट
गृहोपयोगी वस्तू (होम अप्लायन्सेस) च्या बाजारपेठेत आता स्पर्धा वाढली आहे. ग्राहकांना कमी किमतीत चांगल्या दर्जाची वस्तू हवी असते. त्याशिवाय त्यांना चांगली सेवा कोण देतो, यावर व्यापाराचे गणित अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात बाजारपेठेचे स्वरूप बदलले आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे बाजारपेठ बदलत आहे. मोठ्या महागड्या वस्तू अजूनही मुहूर्तावर खरेदी करण्यावर लोकांचा भर आहे. अन्यवेळी कमी किमतीतल्या वस्तू खरेदी करतानाही ग्राहक अधिक चोखंदळ असतो. अनेक ठिकाणी चौकशी करून वस्तू खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो.
- प्रकाश हुलवान, संचालक, लक्ष्मी एंटरप्रायझेस, सांगली
बांधकाम क्षेत्रातही गेल्या काही वर्षात प्रचंड बदल झाले आहेत. फ्लॅट विक्री करताना बांधकाम व्यावसायिकास आता ग्राहकांसाठीच्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. सेवाभावी वृत्ती वाढवावी लागत आहे. ग्राहकांना फ्लॅट पसंत पडल्यानंतर कागदोपत्री सर्व तयारी पूर्ण करून बँकांमार्फत कर्ज प्रकरण करून देणे, फ्लॅट व जागेसंदर्भातील कागदपत्रे त्यांना सुपूर्द करणे, माहितीपुस्तिका देणे, ग्राहकांच्या मागणीनुसार इमारतीजवळ सुरक्षेच्या उपाययोजना करणे, सोसायटी स्थापन करून देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करणे... अशा अनेक गोष्टी बांधकाम व्यावसायिकास पार पाडाव्या लागतात.
- अमित सावंत, प्रतिनिधी, सूर्यवंशी कन्स्ट्रक्शन, सांगली.
दिवसेेंदिवस तयार कपडे घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालला आहे़ त्यामध्ये देखील ‘ब्रॅँडेड’ कपडे घेण्यास प्रामुख्याने युवक पिढी प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. कपड्यांची खरेदी करताना त्यांच्या किमतीला प्राधान्य देण्यात येत नाही. जरी महाग असले तरी कपड्यांच्या दर्जाकडेच अनेकांचे लक्ष असते. भारतीय आणि विदेशी अशा दोन्ही ‘ब्रँड’चे कपडे बाजारात उपलब्ध असले तरीही, विदेशी कपड्यांनाच ग्राहकांची पसंती आहे. या प्रकारच्या कपड्यांच्या किमती आता जरी जास्त वाटत असल्या तरीही, वाढती स्पर्धा लक्षात घेता, भविष्यकाळात यामध्ये निश्चित बदल होईल आणि तयार कपड्यांच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे.
- सुनील चव्हाण, मिक्स अँड मॅच शोरूम, इस्लामपूर.
आधुनिक युगात लॅपटॉप आणि स्मार्ट फोनला अधिकाधिक मागणी युवक वर्गातून होत आहे़ मागील एक ते दोन वर्षांपर्यंत कॉम्प्युटरकडे वळणाऱ्या ग्राहकांच्या मन:स्थितीमध्ये बदल झाला आहे. जवळ बाळगण्यास सुलभ असल्यानेच लॅपटॉप, स्मार्ट फोनने बाजारपेठ काबीज केली आहे. स्मार्ट फोन सावधगिरीने बाळगावा लागतो. परंतु आता विविध कंपन्यांनी यासाठी विम्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. स्मार्ट फोन घेतानाच विशिष्ट रक्कम घेऊन त्याचा विमा उतरविला जातो. त्यामुळे ग्राहकांचे काहीही नुकसान होत नाही. भविष्यकाळात लॅपटॉपपेक्षाही स्मार्ट फोन आणि अॅन्ड्रॉईड मोबाईलला वाढती मागणी राहील.
- सुहास बाबर, स्कायलाईन कॉम्प्युटर्स, मिरज.
शेतीकरिता मजूर मिळत नसल्याने तसेच भाड्याने ट्रॅक्टर मिळणे जवळपास बंद झाल्यामुळे आणि महत्त्वाचे म्हणजे साखर कारखानदारीमुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. साहजिकच अनेकांनी स्वत:चा ट्रॅक्टर घेण्यास प्राधान्य दिले आहे. साधारणत: लहान ट्रॅक्टर हा ५ लाख रुपयांना उपलब्ध होतो. गुणवत्तेत तडजोड न केल्यामुळे भारतीयपेक्षा विदेशी बनावटीच्या ट्रॅक्टरना अधिक मागणी आहे.
- जयकुमार बाफना, णमो ट्रॅक्टर, सांगली.
ग्राहक आता चोखंदळ झाला आहे. विशेष करुन ब्रँडेड कंपन्यांचे साहित्य आजकाल ग्राहकांना पसंत पडत आहे. ग्राहकांचा सध्याचा कल वस्तू दुरुस्तीकडे नाही. साहित्य वापरणे त्याचा वापर संपल्यास किंवा ते खराब झाल्यास त्याच्या दुरुस्तीमध्ये न पडता सरळ ते फेकून देणे, अशी मानसिकता ग्राहकांची झाली आहे. आमच्या तृप्ती एंटरप्रायजेसकडून पिठाची चक्की, भेटवस्तूंची विक्री केली जाते. पिठाच्या गिरण्या आता ६ हजारापासून तेरा हजारापर्यंत उपलब्ध आहेत. दसरा, दिवाळीमध्ये मिठाईऐवजी भेटवस्तू देण्यावर आता भर दिला जात आहे. मिठाईऐवजी वस्तू भेट दिल्या, तर त्या कायमस्वरुपी घरात राहतील. त्यामुळे कायमस्वरुपी आठवण राहील. पिठाच्या गिरण्या संग्रहीत करुन बनवल्या जातात. याला ग्राहकांकडून अधिक पसंती दिली जात नाही. जरी त्या चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी ग्राहकांना पसंत पडत नाहीत. वॉरंटी देणाऱ्या कंपन्यांच्या वस्तू महाग असल्या तरी ग्राहकांना पसंत पडतात. त्यामुळे आजकाल ग्राहकांचा कल हा ब्रँडेड वस्तू खरेदीकडे आहे.
- राजूभाई ठक्कर, संचालक, तृप्ती एंटरप्रायजेस, सांगली
पूर्वीच्या काळाशी तुलना केली, तर आता देवपूजा साहित्याबाबतही ग्राहक अधिक चोखंदळ झाल्याचे दिसून येते. ग्राहकांची खरेदीची क्षमता वाढली आहे. पूजेचे साहित्य नेतानाही ग्राहकांना चांगल्या दर्जाचे साहित्य हवे असते. ज्याठिकाणी चांगले साहित्य मिळणार नाही, त्याठिकाणी ते पुन्हा जाणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांची मागणी काय आहे, त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत, त्यांची रुची कशात आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास दुकानदारांना करावा लागत आहे. त्यादृष्टीने बदलही करावा लागतो. ग्राहकांच्या आवडीच्या गोष्टी विक्रीस ठेवणे क्रमप्राप्त झाले आहे. आमच्या देवपूजा साहित्य विक्रीच्या दुकानाचे संचालक गणेश व महेश तकटे यांनी गेल्या काही वर्षात ग्राहकांच्या या चिकित्सक वृत्तीचा अभ्यास करून त्याप्रमाणे बदल केले. ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता झाल्यास त्यांच्याबरोबर अनेक ग्राहक जोडले जातात. अंतर कितीही लांबचे असले तरी ग्राहक दुकानापर्यंत येतोच. त्यांना अपेक्षित सेवा देण्यासाठीही आमची धडपड सुरू असते. देवपूजा साहित्याचे विविध प्रकार उपलब्ध होत आहेत. असे साहित्य आम्ही ठेवले आहे. वस्तू न घेता कुणी परत जाऊ नये, यावर लक्ष देतो.
-प्रफुल्ल मुगळखोड, विक्री अधिकारी, देवपूजा, सांगली
बदलती जीवनशैली आणि चित्रपटातील अत्याधुनिक दुचाकींच्या क्रेझमुळे आकर्षक लुक अणि नवीन स्टाईलच्या वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ होत आहे. किक स्टार्टपेक्षा सेल्फ स्टार्टची सुविधा असणारी दुचाकी घेण्याला ग्राहक प्राधान्य देत आहेत. दुचाकी कंपन्या युवकांना समोर ठेवूनच वाहनांची रचना करीत आहेत. महागाईमुळे भविष्यकाळात ‘लुक’चा विचार न करता ग्राहक पुन्हा अॅव्हरेजलाच महत्त्व देतील.
- श्रीकांत तारळेकर, सिध्दिविनायक हिरो, सांगली.
शहरात मॉल संस्कृती नागरिकांच्या अंगवळणी पडल्याने आता ग्रामीण भागातही याचे आकर्षण आहे. एकाच छताखाली जर ग्राहकांना सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध झाल्या, तर ते त्यांच्या सोयीचेच आहे. धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मॉलमधील खरेदीमुळे नागरिकांच्या वेळेचीही बचत होते. मॉलमध्ये विविध कंपन्यांच्या वस्तू हाताळून पाहता येतात, ही महत्त्वाची बाब आहे. ग्रामीण भागात आता मॉल संस्कृती रुजली आहे.
- संजय शिंदे, अनिता सुपर शॉपी, खानापूर.
आटपाडी, जत तालुक्यांच्या टोकापर्यंत अजूनही ट्रॅक्टरची गरज आणि त्याचा उपयोग काय आहे हे पोहोचलेले नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटिंगची गरज आहे. यापुढील काळात घरटी ट्रॅक्टर होईल असे मला वाटते. बैलांचा वापर हळूहळू आता कमी होऊ लागला आहे. बैलांच्या तुलनेत ट्रॅक्टर वापराचा खर्च कमी आहे. लहान शेतकरीही आता ट्रॅक्टर बाळगू शकेल, इतक्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. आगामी काळात ट्रॅक्टरच्या किमती कमी होतील. सध्या ३० ते ९० एचपीच्या ट्रॅक्टर्सची विक्री सुरु आहे. शेती आणि वाहतुकीसाठी ट्रॅक्टरना मागणी आहे.
- पांडुरंग बसुगडे, साधुराम ट्रॅक्टर