लोकमत इफेक्ट : ‘त्या’ वृद्धांना भेटले जीवलग, अश्रूंच्या वर्षावात वृद्धाश्रमात दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 07:23 PM2018-11-13T19:23:44+5:302018-11-13T19:25:26+5:30
‘माफ करा, चूक झाली...’ अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त करीत त्या दोन वृद्धांची मंगळवारी सकाळीच त्यांच्या मायेच्या माणसांनी भेट घेतली. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे जिवलग भेटल्याने अश्रूंच्या वर्षावात वृद्धाश्रमात जणू पुन्हा दिवाळीच साजरी झाली.
कोल्हापूर : ‘माफ करा, चूक झाली...’ अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त करीत त्या दोन वृद्धांची मंगळवारी सकाळीच त्यांच्या मायेच्या माणसांनी भेट घेतली. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे जिवलग भेटल्याने अश्रूंच्या वर्षावात वृद्धाश्रमात जणू पुन्हा दिवाळीच साजरी झाली.
शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील चौघेजण मायेच्या माणसांची वाट पाहत रुग्णालयात उपचार घेत होते. मायेच्या माणसांची भेट हाच त्यांच्यावरील उपचार होता. त्यामुळे ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे दोघांच्या नातेवाइकांच्या मनात घालमेल झाली. त्यांनी तडक वृद्धाश्रम गाठला. त्यांच्या वडिलांना रुग्णालयातून वृद्धाश्रमात आणले. सून, नातवंडांसह मुलगा भेटायला आल्यामुळे त्या वृद्धांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोघे आणि कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दोघेजण उपचार घेत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड, मलकापूर; सांगली जिल्ह्यातील खानापूर-विटा आणि कर्नाटकातील निपाणी येथील हे वृद्ध घोसरवाडच्या जानकी वृद्धाश्रमात आहेत. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे आज त्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला.
दुर्धर आजारामुळे वृद्धाश्रमात ठेवण्यास भाग पडल्यामुळे संबंधित वृद्धांच्या मुलांनी सकाळीच घोसरवाड येथे येऊन त्यांची भेट घेतली. सोबत ते दिवाळीचा फराळ, फळे आणि भेटवस्तूही घेऊन आले होते. नातवंडे आणि सून भेटायला आल्यामुळे वृद्धांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ‘आप्तांची भेट झाली, आता मरायला मोकळे झालो,’ अशा शब्दांत त्यांनी आपले मन मोकळे केले. नातेवाइकांनी भेट घेताच आजार पळून गेल्याचे मत या वृद्धांनी बोलून दाखविले.
‘आपण आता संपूर्णपणे बरे झाले आहोत,’ अशा शब्दांत आनंद व्यक्त केला. त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. मुलांनीही ‘आम्ही दर महिन्याला येतो; पण वडिलांना सांभाळा. त्यांना दूध, फळे द्या; खर्चाची काळजी करू नका,’ असे आश्वासन दिल्याचे वृद्धाश्रमाचे संचालक बाबासाहेब पुजारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वृद्धाश्रमात दिवाळी
सकाळी वृद्धाश्रमात आलेल्या त्या वृद्धांच्या नातेवाईकांनी केवळ त्यांच्या वडिलांसाठीच नव्हे, तर सर्वच वृद्धांसाठी भेटवस्तू आणि फराळ आणला होता; त्यामुळे तेथे पुन्हा एकदा दिवाळीच साजरी झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
त्या दोघांनाही प्रतीक्षा त्यांच्या माणसांची
वृद्धाश्रमातील दोघांच्या नातेवाईकांची या बातमीमुळे भेट झाल्यामुळे ज्यांचे नातेवाईक आले नव्हते, अशा दोघांना आपलेही नातेवाईक येतील, अशी आशा आहे. आप्तांच्या वाटेकडे त्यांच्याही नजरा लागल्या आहेत.