‘लोकमत’ने केला स्त्रीसन्मानाचा जागर

By admin | Published: August 7, 2016 12:46 AM2016-08-07T00:46:43+5:302016-08-07T00:58:21+5:30

हजारो हात एकवटले : कोल्हापूरकरांची भवानी मंडपात भव्य मानवी साखळी

'Lokmat' has made a woman aware of women's emotions | ‘लोकमत’ने केला स्त्रीसन्मानाचा जागर

‘लोकमत’ने केला स्त्रीसन्मानाचा जागर

Next

कोल्हापूर : ढोलपथकाचा नाद... स्त्रीशक्तीची महती सांगणारा पोवाडा, पथनाट्य, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर, ‘नारीशक्ती जागृत करूया, नराधमांशी लढा देऊया...’ अशी साद देत कोल्हापूरवासीयांनी शनिवारी स्त्रीसन्मानाचा जागर केला. आम्ही स्त्रियांच्या आत्मसन्मानाला धक्का लावणार नाही, अशी शपथ घेत त्यांनी मैत्रीचा आश्वासक हात दिला. गेल्या पाच दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या वरुणराजानेही जणू एकवटलेल्या स्त्रीशक्तीला मुजरा करीत उसंत घेतली आणि सूर्यनारायणानेही हजेरी लावली.
‘लोकमत’तर्फे मैत्रीदिनाचे औचित्य साधून ‘धागा जोडू मैत्रीचा... सन्मान करू स्त्रीत्वाचा...’ ही संकल्पना घेऊन भवानी मंडपात मानवी साखळी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले. आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले यांनी ही मशाल पुढे नेली. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मधुरिमाराजे छत्रपती, फाईव्ह महाराष्ट्र बटालियनचे कर्नल डी. के. दास, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, नगरसेविका हसिना फरास, माधवी गवंडी, पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील, राजलक्ष्मी खानविलकर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्यासह खासदार संभाजीराजे, युवराज्ञी संयोगिताराजे, महापौर अश्विनी रामाणे यांची उपस्थिती होती. युवराज्ञी संयोगिताराजे यांनीही जो स्त्रीचा सन्मान करतो तोच खरा पूरूष अशा शब्दा मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले,‘ मैत्रीदिनापासून सर्व सणांची सुरुवात होते. महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटना टाळण्यासाठी नवीन समाज घडविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. केवळ अशा घटनांचा प्रतिकार करून चालणार नाही; तर नव्या विचारधारेचे पाऊल पुढे टाकल्याशिवाय समाज बदलत नाही. म्हणूनच ‘लोकमत’ने केवळ बातम्या न देता मानवी साखळीद्वारे हे समाज बदलाचे पाऊल उचलले आहे.’ ‘लोकमत सखी मंच’च्या संयोजिका प्रिया दंडगे यांनी स्वागत केले. वारणा वडगावकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख उपस्थित होते. (हॅलो ४ वर)


नाद खुळा ‘करवीर नाद’चा
करवीर नाद ढोल-ताशा पथकात स्तवधीर देसाई यांच्यासह ५५ युवक-युवतींनी ढोल-ताशांच्या कडकडाटाने अंगावर रोमांच निर्माण केले. या पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करीत स्वरचित ‘करवीर नाद’ हा आविष्कार सादर केला. त्यानंतर बिट, टाळी बिट, १६ थापी, शिवस्तुती, ताल, आरती, दक्षिणात्य ढोल, राजस्थानी ढोल, नाशिक ढोल हे आविष्कार सादर केले.


लक्षवेधी
फलक
महिलांची एकजूट तर यावेळी दिसून आली; पण त्यासोबत मानवी साखळीमध्ये विद्यार्थ्यांनी हातांमध्ये घेतलेले फलक यावेळी लक्षवेधी ठरत होते. यामध्ये ‘संस्कृतीची होत असेल विकृती; तर काय करील प्रकृती,’ ‘कशा जगतील निर्भया आणि काय करतील रिंकू, अमृता’.... ‘अवतरली स्त्री नावाची जात, करण्यासाठी अरिष्टावर मात’, ‘नारीशक्ती जागृत करूया, नराधमांशी लढा देऊया’, ‘वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खोडू नको कळी आई देश घडवायचा आहे मला’, ‘स्त्रीत्वाचा नका करू तिरस्कार, चांगले विचार रुजवा, होईल तुमचा सत्कार,’ ‘आई, बहीण, पत्नी, मुलगी, नाती वाढवितात कुटुंबाची शान; स्त्री कोणीही, कोणत्याही जातिधर्माची असो, प्रत्येकानेच केला पाहिजे तिचा सन्मान ’, ‘एकजुटीने मिळेल बळ, समाजाला जगवण्याची हीच खरी वेळ’, ‘भ्रूणहत्या करायला जाऊन आत्महत्या करू नका, भावी पिढ्यांचे मारेकरी तुम्हीच तुमचे ठरू नका,’ आदी फलक घेऊन उपस्थितांचे लक्ष वेधले.

Web Title: 'Lokmat' has made a woman aware of women's emotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.