Lokmat Kolhapur Maha Marathon : झुम्बा डान्स, ढोल-ताशे, पोलीस व स्कूल बॅँडने स्पर्धक रिफ्रेश, रंगारंग कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 07:17 PM2018-02-18T19:17:38+5:302018-02-18T19:30:30+5:30
झुम्बा डान्सने आलेली ऊर्जा, भजनी मंडळाचा भक्तिसूर, झांजपथकांचा ताल, ढोल-ताशांचा गजर, तुतारी, पोलीस बँड आणि स्कूल बॅँडची लयबद्धता, मर्दानी खेळांचा थरार, मुलींचे पारंपरिक नृत्य अशा रंगारंग कलाविष्कारांनी ‘राजुरी स्टील’ प्रायोजित ‘लोकमत महामॅरेथॉन’मधील स्पर्धकांचा उत्साह वाढला.
कोल्हापूर : झुम्बा डान्सने आलेली ऊर्जा, भजनी मंडळाचा भक्तिसूर, झांजपथकांचा ताल, ढोल-ताशांचा गजर, तुतारी, पोलीस बँड आणि स्कूल बॅँडची लयबद्धता, मर्दानी खेळांचा थरार, मुलींचे पारंपरिक नृत्य अशा रंगारंग कलाविष्कारांनी ‘राजुरी स्टील’ प्रायोजित ‘लोकमत महामॅरेथॉन’मधील स्पर्धकांचा उत्साह वाढला.
‘भागो रे...’ म्हणत कोल्हापूरकरांनी रविवारच्या दिवसाची सुरुवात भल्या पहाटे मॅरेथॉनमधील सहभागाने केली. खास औरंगाबादहून आलेल्या टीमने व्यासपीठावर येताच थिरकायला लावणाऱ्या संगीतावर तन-मनाला ऊर्जा देणाऱ्या झुम्बा डान्सने हजारोंच्या संख्येने आलेल्या स्पर्धकांचे वॉर्म-अप करून घेतले.
रात्रीच्या विश्रांतीची सुस्ती जाऊन सर्वांमध्येच धावण्यासाठीचा उत्साह संचारला. दुसरीकडे, विक्रमनगरच्या करवीर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ढोलांच्या तालावर ताशांचा गजर करीत स्पर्धकांचे स्वागत केले; तर पारंपरिक नऊवारी साडी परिधान केलेल्या मुलींनी फुलांचा वर्षाव करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. स्पर्धा सुरू झाली आणि आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.
पोलीस ग्राउंडपासून सुरू झालेल्या या रनमधील स्पर्धकांनी रस्ते फुलून गेले. तीन किलोमीटरपासून ते २१ किलोमीटरपर्यंतच्या या प्रवासात स्पर्धकांना धावण्याचा थकवा येऊ नये, पुढे-पुढे धावत गेल्यानंतर त्यांचा उत्साह कायम राहावा आणि अधिक वेगाने आपली रन पूर्ण करता यावी यासाठी दर एक-दोन किलोमीटरच्या अंतरावर चीअर अप पॉइंट ठेवण्यात आले होते. त्याची सुरुवात झाली सुरेल भक्तिगीतांनी आणि भजनांनी.
पितळी गणपतीच्या चौकात देवकर पाणंदमधील श्री दत्तगुरू प्रासादिक भजनी मंडळाचे सुरेश कांदेकर यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी भजन सादर केले. धैर्यप्रसाद हॉलच्या चौकात झालेला गॅस बलूनचा वर्षाव स्पर्धकांना सुखावून गेला.
शेजारीच असलेल्या पोलीस बॅँडने सादर केलेल्या जयोस्तुते, सारे जहाँ से अच्छा, हम सब भारतीय है, कदम कदम बढाये जा अशा देशभक्तिपर गीतांनी स्पर्धकांध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. सहायक फौजदार व बॅँड मेजर श्रीकांत कोरवी यांच्या मार्गदर्शनाखाली १६ महिला व पुरुष पोलिसांनी ही धून वाजविली.
स्पर्धक धावत होते तसे पुढे गोल्ड जिमच्या दारात अल्फान्सो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लाल आणि पांढºया रंगाचा आकर्षक गणवेश परिधान करून स्कूल बॅँड वाजविला. पायांच्या तालातही त्यांची शिस्त आणि काटेकोरपणा जाणवत होता. फादर मॅथ्यू आणि सिस्टर दीपा यांच्या पुढाकाराने सादर झालेल्या स्कूल बॅँडने उपस्थितांची मने जिंकली.
कावळा नाक्यावर नंदू पिंटू ग्रुपच्या कलाकारांनी ढोल-ताशा वाजविला. पुढे सयाजी हॉटेलच्या दारात विजय शेलार यांच्या फूट ऑन बीट्सच्या ग्रुपने भांगडा, फिटनेस, अॅरोबिक्स अशा प्रकारांत झुम्बा डान्स सादर करून स्पर्धकांचा थकवा दूर करण्याचा प्रयत्न केला.
या स्पर्धेतील २१ किलोमीटरच्या स्पर्धेचा मार्ग असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर चाटे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक ढोल-ताशांचा निनाद करीत थकलेल्या स्पर्धकांना चीअरअप केले. शिक्षिका मेघा कांबळे यांनी ढोल वाजविला. त्यानंतर शेवटचे पॉइंट असलेल्या शिवाजी विद्यापीठ तलावाजवळही नंदू पिंटू ग्रुपच्या कलाकारांनी ढोल-ताशा वाजवीत स्पर्धकांचा उत्साह वाढविला.
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ओंकार शेटे यांच्या श्वास अकॅडमीमधील कलाकारांनी ‘घुमर घुमर’सारख्या पारंपरिक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. रमणमळा चौकात मर्दानी खेळाचा राजा दिवंगत सुहास ठोंबरे राजे मर्दानी आखाड्याच्या बालचमूने लाठीकाठी, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांचे सादरीकरण करून उपस्थितांची व स्पर्धकांची मने जिंकली.
शांती बंगलोच्या शेवटच्या पॉइंटवर वाशी येथील अशोक लोखंडे यांच्या ढोल-ताशांच्या वाद्यांसह शंकर पाटील (रॉकेट) यांनी डोक्यावर नारळ फोडून सर्वांना अचंबित केले. स्पर्धकांना आणखी वेगाने धावण्यासाठी प्रोत्साहन दिले.
कोल्हापुरातील पितळी गणपती चौकात रविवारी लोकमत महामॅरेथॉनमधील स्पर्धकांना प्रौत्साहन मिळावे यासाठी देवकर पाणंदमधील श्री दत्तगुरू प्रासादिक भजनी मंडळाने भजन सादर केले.