कोल्हापुरात उद्या रंगणार 'लोकमत महामॅरेथॉन'चा थरार, बारा लाखांपर्यंतची बक्षिसे; धावपटूंची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:01 IST2025-02-22T11:59:23+5:302025-02-22T12:01:22+5:30
बीब एक्स्पो आज

संग्रहित छाया
कोल्हापूर : प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या लोकमतकोल्हापूर महामॅरेथॉनच्या आठव्या पर्वाचा प्रत्यक्ष थरार उद्या रविवारी (दि. २३) पोलिस परेड मैदानावर रंगणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी व्यावसायिक धावपटूंसह सर्वसामान्य आबालवृद्ध सहभागी होण्यासाठी आतूर आहेत. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. राज्यासह परराज्यातील व्यावसायिक धावपटूंनी नावनोंदणी करीत या महामॅरेथॉनला विशेष पसंती दिली आहे.
कोल्हापुरात कसबा बावडा पोलिस परेड मैदानातून रविवारी पहाटे पाच वाजता या महामॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. सर्वच गटातील स्पर्धकांनी त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. जसजशी महामॅरेथॉनची वेळ जवळ येईल तशी धावपटूंचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक क्रीडा संघटना, ग्रुप, महिला मंडळ, क्लब, असोसिएशन, संस्था, उद्योग, कारखाने आणि विद्यार्थ्यांनी नोंदणीला प्राधान्य दिले आहे.
अनेकांनी आठव्या पर्वाची सुरुवात झाल्यानंतर तत्काळ नोंदणी करून आपला सहभाग निश्चित केला. विशेष म्हणजे, मित्रमंडळींसह सहकुटुंब महामॅरेथॉनचे बुकिंग केले आहे. बहुतांश फॅमिली रन करणारे ३ आणि ५ किलोमीटर शर्यतीत धावणार आहेत. वैयक्तिक धावणारे हौशी व व्यावसायिक धावपटू १० आणि २१ किलोमीटरच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत. या सर्वांचा एक अनोखा मेळाच पोलिस परेड मैदानावर रंगणार आहे.
बारा लाखांपर्यंतची बक्षिसे
मॅरेथॉनमध्ये २१ आणि १० किलोमीटरमधील विजेत्यांना वयोगटनिहाय एकूण मिळून १२ लाख रुपयांची बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. तर ३, ५ किलोमीटरमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
बीब एक्स्पो आज
लोकमत महामॅरेथॉनचा आज (शनिवारी) सकाळी १० वाजता पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये बीब एक्स्पो होणार आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना टी-शर्ट, बीब (चेस्ट नंबर) गुडी बॅगचे वाटप केले जाणार आहे.
सर्व सहभागी धावपटूंनी पहाटे ५ वाजता एकत्र यायचे आहे
अशी असेल वेळ
२१ किमी मॅरेथॉन
५.३० : पेसर्सची ओळख, धावण्याचा मार्गाची माहिती
५.४० : वॉर्मअप
६ :०० : रेस सुरू
१० किमी रेसची सुरुवात
सकाळी ६:३० वाजता
५ आणि ३ किलोमीटर धावपटूंनी साडेपाच वाजता एकत्र यायचे आहे.
स्पर्धेची सुरुवात
५ किमी : सकाळी ६:४० वाजता
३ किमी : ६ वा.५० वाजता
सखी रन ३ किलोमीटर
६ वाजून ५५ मिनिटे
महामॅरेथॉन झाल्यानंतर तिथेच थोड्याच वेळात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
अल्पोपाहाराची सोय
मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना उपमा, केळी, दूध आणि प्रोटिन बार अशा अल्पोपाहाराचे वाटप रेस संपल्यानंतर करण्यात येणार आहे.