लोकमत महामॅरेथॉनचा कोल्हापुरात येत्या रविवारी थरार रंगणार, बारा लाखांपर्यंतची बक्षिसे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 01:55 PM2024-01-22T13:55:49+5:302024-01-22T13:56:16+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद, नोंदणीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस
कोल्हापूर : कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी थंडीच्या हवामानामुळे राज्यासह परराज्यातील धावपटूंमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या लोकमत कोल्हापूर महामॅरेथाॅनच्या सातव्या पर्वाचे आयोजन रविवारी (दि.२८) करण्यात आले आहे. या महामॅरेथाॅनमध्ये सहभागी होण्यासाठी व्यावसायिक धावपटूंसह सर्वसामान्य आबालवृद्ध सहभागी होण्यासाठी आतूर आहेत. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. राज्यासह परराज्यातील व्यावसायिक धावपटूंनी नावनोंदणी करीत या महामॅरेथाॅनला विशेष पसंती दिली आहे.
कोल्हापुरात कसबा बावडा पोलिस परेड मैदानातून रविवारी सकाळी पाच वाजता कोल्हापूर महामॅरेथाॅनला सुरुवात होणार आहे. सर्वच गटातील स्पर्धकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जसजशी महामॅरेथाॅनची तारीख जवळ येईल त्याप्रमाणे शहरासह ग्रामीण भागातील धावपटूंचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक क्रीडा संघटना, ग्रुप, महिला मंडळ, क्लब, असोसिएशन, संस्था, उद्योग, कारखाने आणि विद्यार्थ्यांनी नोंदणीला प्राधान्य दिले आहे.
अनेकांनी सहाव्या पर्वात नोंदणी फुल्ल झाल्याने निराशा होती. याची जाणीव ठेवून यंदाच्या सातव्या पर्वात नोंदणी सुरू झाल्यानंतर तत्काळ नोंदणी करून आपला सहभाग निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, मित्रमंडळींसह सहकुटुंब महामॅरेथाॅनचे बुकिंग केले आहे. बहुतांश फॅमिली रन करणारे ३ आणि ५ किलोमीटर शर्यतीत धावणार आहेत. तर, वैयक्तिक धावणारे हौशी व व्यावसायिक धावपटू १० आणि २१ किलोमीटरच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत.
बारा लाखांपर्यंतची बक्षिसे
मॅरेथाॅनमध्ये २१ आणि १० किलोमीटरमधील विजेत्यांना वयोगटनिहाय एकूण मिळून १२ लाख रुपयांची बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. तर २, ५ किलोमीटरमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
शनिवारी एक्स्पो
शनिवारी (दि.२७) पोलिस परेड मैदानाजवळील अलंकार हाॅलमध्ये ‘महामॅरेथाॅन एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धकांना बीब आणि गुडीबॅगचे वितरण केले जाणार आहे.
लोकमत महामॅरेथॉन उपक्रमात वारणा दूध संघ सहप्रायोजक म्हणून आहे. या सातव्या पर्वात आम्ही सर्व जण सहभागी झालो आहोत. आज प्रत्येकाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज व्यायाम आवश्यक आहे. ‘लोकमत’ने सुरू केलेला महामॅरेथॉन उपक्रम खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी या उपक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. -सुधीर कामेरीकर, अकौंटस मॅनेजर, वारणा दूध संघ, तात्यासाहेब कोरेनगर.