लोकमत 'महामॅरेथॉन'च्या ‘बीब एक्स्पो’चे कोल्हापुरात थाटात उद्घाटन, धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By संदीप आडनाईक | Published: January 27, 2024 04:05 PM2024-01-27T16:05:55+5:302024-01-27T16:07:40+5:30

‘‘कर दे धमाल’’चे हॅश टॅग सोशल मिडियावर

Lokmat Marathon Beeb Expo grand opening in Kolhapur | लोकमत 'महामॅरेथॉन'च्या ‘बीब एक्स्पो’चे कोल्हापुरात थाटात उद्घाटन, धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत 'महामॅरेथॉन'च्या ‘बीब एक्स्पो’चे कोल्हापुरात थाटात उद्घाटन, धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : ‘लोकमत’महामॅरेथॉनच्या सातव्या पर्वातील चौथ्या स्पर्धेच्या नाेंदणीला कोल्हापुरांनी उदंड प्रतिसाद दिला. उद्या, रविवारी पहाटे होणाऱ्या या स्पर्धेसाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. पोलिस मुख्यालयातील ‘अलंकार’ सभागृहात शनिवारी पार पडलेल्या ‘बीब एक्स्पो’लाही दणक्यात प्रारंभ झाला. विशेष म्हणजे याठिकाणी सायंकाळपर्यंत गुडी बॅग किटचे वितरण सुरु राहणार आहे. 

सकाळी ११ वाजता मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते फुगे सोडून आणि रिबन कापून या ‘बीब एक्स्पो’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, वारणा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मोहन येडूरकर, गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. 

प्रास्तविक भाषणात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, या स्पर्धेला कोल्हापुरच्या पाच हजार स्पर्धकांनी दिलेला प्रतिसाद पाहुन केलेल्या कष्टाचे चीज झाले. मॅरेथॉनच्या इतिहासात ही स्पर्धा मैलाचा दगड बनेल. ही परंपरा कायम राहिल. 

मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, ‘लोकमत’च्या वतीने होणाऱ्या विविध स्पर्धात राजघराणे एक परिवार म्हणून सहभागी होतो. रस्त्यावरची एक स्पर्धा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या आरोग्यदायी उपक्रमाला लोकमतने शास्त्रोक्त आणि प्री ट्रेनिंग म्हणून लोकप्रिय केले. जगाच्या पाठीवर अमेरिकन फॉर्म्युल्यानुसार २२० गुणिले वय भागिले ७० टक्के असा हार्टरेट आहे, तेच मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या स्पर्धकाचे सूत्र असले पाहिजे. ‘लोकमत महामॅरेथॉन’ म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे.

विविध मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर टी शर्ट, गुडी बॅग आणि पदकाचे अनावरण करण्यात आले. वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक माेहन येडूरकर, ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबाेले, ऑयकॉन स्टीलच्यावतीने संचालक उन्मेष राठी, पार्वती स्टीलचे शाहू जाधव, रेणुका स्टीलचे उमेश शिंदे, सुंदर इंडस्ट्रीजचे संचालक विक्रम सेठिया, सुंदर बिस्किट ॲन्ड नमकीनचे मार्केटिंग हेड अभिषेक मुखाणी, नागपूर विभागाचे मार्केटिंग हेड राहुल सहारे, सोसायटी टीचे मार्केटिंग हेड क्षितिज तांडेल, फूड स्ट्रॉन्गच्या फिजिओथेरपीस्ट डॉ. सृष्टी शेळके, सिध्दिविनायक हॉस्पिटलचे डॉ. संतोष पाटील, रेडिओ मिरचीचे आरजे मनिष आपटे उपस्थित होते. सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, इव्हेंटचे महाराष्ट्र, गोव्याचे हेड रमेश डोडवाल, रेस डायरेक्टर संजय पाटील, ‘लोकमत’ कोल्हापूरचे इव्हेंट हेड दीपक मनाठकर यांच्यासह विभागप्रमुखांनी उपस्थितांचे स्वागत केले.

‘अलंकार’वर स्पर्धकांची गर्दी

या एक्स्पोच्या निमित्ताने पोलिस प्रशासनाचे ‘अलंकार’ सभागृह आणि परिसर अक्षरश: सजलेला होता. फुग्यांची सजावट, लोकमत महामॅरेथॉनची माहिती देणारे विविध डिजिटल फलक, प्रायोजकांचे रंगीबेरंगी स्टॉल्स यामुळे इथे वेगळाच माहोल तयार झाला आहे. सकाळी दहा पासूनच या ठिकाणी खेळाडू आणि नागरिकांनी गुडीबॅग नेण्यासाठी गर्दी केली.

दमदार रॉक बँडचा परफॉर्मन्स

सभागृहात मुख्य कार्यक्रमाआधी रॉक बँड परफॉर्मर मंदार जोशी यांनी गिटारच्या सहाय्याने सादर केलेल्या हिंदी, मराठी गाण्यांनी लक्ष वेधून घेतले.

‘‘कर दे धमाल’’चे हॅश टॅग सोशल मिडियावर

सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच सहभागी नागरिक, खेळाडू यांची किलोमीटर्सनुसार स्वतंत्र यादी लावली होती. ठळक अक्षरात लावलेल्या या फलकांमुळे नाव अन् नंबर शोधण्यात स्पर्धकांना कोणतीच अडचण येत नव्हती. ७१ वर्षांच्या वृध्दासह छोट्या मुलांसोबत कुटूंबियही कीट नेण्यासाठी येत होते. यामध्ये पोलिस प्रशासन आणि शासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता. परिसरात लावलेल्या सेल्फी पॉईंटवरुन ‘‘कर दे धमाल’’, ‘‘लोकमत महामॅरेथॉन’’ला हॅश टॅग करुन फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत होते.

Web Title: Lokmat Marathon Beeb Expo grand opening in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.