lokmat marathon2023: अनवाणी धावणारा परशराम ठरला हिरो, परिस्थिती बेताची असल्याने बूट घेणेही शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 01:34 PM2023-01-09T13:34:39+5:302023-01-09T13:35:26+5:30
वय ४२; पण त्यांचा वेग थक्क करणारा
कोल्हापूर : पहाटेच्या मनाला सुखावणाऱ्या शीतल वातावरणात ढोल-ताशे, लेझीम, पोलिस बँड, शाळकरी मुलींचे नृत्य, आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, युवक, युवतींचा आत्मविश्वास अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात कोल्हापूरची ‘लोकमत महामॅरेथॉन’ रंगली. महामॅरेथॉनमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेले परशुराम भोई लक्षवेधी कामगिरी करून हिरो ठरले आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटकात परशुराम भोई यांची ओळख अनवाणी पळून यश मिळविणारा धावपटू अशी झाली आहे. लोकमत महामॅरेथॉनमध्येही ते लक्षवेधी कामगिरी करून हिरो ठरले. त्यांचे गाव गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव. परिस्थिती बेताची असल्याने पायात घालण्यासाठी बूट घेणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे लहानपणापासूनच ते धावण्याचा अनवाणीच सराव करतात.
तीच त्यांना सवय झाल्याने आजही पायात बूट न घालता धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतात आणि विशेष म्हणजे जिंकतातही. सध्या त्यांचे वय ४२ आहे; पण त्यांचा वेग थक्क करणारा आहे. स्पर्धा सुटण्यापूर्वी पायात बूट नाही आणि हा काय पळणार या भावनेने अनेकजण त्यांच्याकडे पाहतात. मात्र पहिला क्रमांक आल्यानंतर कुतूहलाने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तेच गर्दी करतात असा त्यांच्या याबाबतीतला अनुभव आहे.