स्वत:हून तुम्ही तर केला असता का! महापालिकेच्या आयुक्तांनाही ती कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 11:53 AM2020-05-02T11:53:51+5:302020-05-02T11:55:02+5:30
कोल्हापूर : मंगळवारी रात्री दहाची वेळ. ताराबाई पार्कातील एक दाम्पत्य जेवण आटोपल्यानंतर शतपावली करायला बाहेर पडले... जाताना तोंडाला मास्क ...
कोल्हापूर : मंगळवारी रात्री दहाची वेळ. ताराबाई पार्कातील एक दाम्पत्य जेवण आटोपल्यानंतर शतपावली करायला बाहेर पडले... जाताना तोंडाला मास्क लावायला विसरले... दाम्पत्य काही अंतर चालत जातेय तोच तेथून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची गाडी जाते... आयुक्तांचे लक्ष दाम्पत्याकडे जाते... आयुक्त गाडीतून उतरतात... तोंडाला मास्क का लावला नाही, म्हणून विचारतात...
दाम्पत्य आपली चूक झाल्याचे कबूल करते... आयुक्तांशी चर्चेवेळी दाम्पत्याने आपली ओळख सांगितली. ‘ठीक आहे’ असे म्हणत, ‘उद्यापासून तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडा,’ असा सल्ला आयुक्तांनी त्यांना दिला.
‘रात गयी, बात गयी’ विषय संपला असे आयुक्तांना वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आयुक्त कार्यालयात पोहोचले. ११ वाजता एक व्यक्ती आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचली. त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. २०० रुपयांची करून आणलेली पावतीही त्यांनी दाखविली. आयुक्तसुद्धा क्षणभर गोंधळले. ‘अरे हो, असं का...’ असं म्हणत आयुक्तांनी त्या व्यक्तीला बसायला सांगितले. आलेली व्यक्ती आयुक्तांना सांगू लागली... ‘काल रात्री झालेल्या चुकीबद्दल आमच्या साहेबांना खूपच वाईट वाटले. जर सर्वसामान्य नागरिकांना दंड होत असेल तर आपणही काही वेगळे नाही, याची त्यांना जाणीव झाली. ‘मास्क न लावल्याबद्दल किती दंड आकारला जातो ते पहा आणि दोघांचा दंड भरा. पावतीही आयुक्तसाहेबांना जाऊन दाखवा,’ असे त्यांनी मला सांगितले आहे.’
आयुक्त कलशेट्टी यांनाही ही कृती भावली. त्यांनी ज्यांना अडवून मास्क लावला नाही म्हणून विचारणा केली ते होते... ‘बीएसएनल’चे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार चौधरी. त्यांनी आपल्याकडून झालेली चूक मोठ्या मनाने मान्य केलीच; शिवाय त्यांनी न सांगता २०० रुपयांचा दंडही भरला. त्याही पुढे जाऊन चौधरी यांनी ‘बीएसएनएल’च्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वाटले आणि ते लावण्यास सांगितले. मोठ्या मनाने चूक मान्य करण्याची आणि त्याबद्दल दंड भरण्याची मानसिकता विरळच!