लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व: रथोत्सवाने जागर, राजर्षी शाहूंच्या जयजयकारात स्मृतिस्तंभ मुंबईला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:14 PM2022-04-18T13:14:27+5:302022-04-18T13:18:32+5:30

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साधून राजर्षी शाहू महाराजांनीच जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सुरू केलेल्या रथोत्सवापासून कृतज्ञता पर्वाचा जागर जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू होत आहे.

Lokraja Shahu Gratitude Festival: Awakening of Gratitude Festival by Rathotsava | लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व: रथोत्सवाने जागर, राजर्षी शाहूंच्या जयजयकारात स्मृतिस्तंभ मुंबईला रवाना

लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व: रथोत्सवाने जागर, राजर्षी शाहूंच्या जयजयकारात स्मृतिस्तंभ मुंबईला रवाना

googlenewsNext

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीच्या औचित्याने नियोजित केलेल्या लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाची सुरुवात सोमवारी भवानी मंडपात सायंकाळी साडेसहा वाजता रथोत्सवाने होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साधून राजर्षी शाहू महाराजांनीच जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सुरू केलेल्या रथोत्सवापासून कृतज्ञता पर्वाचा जागर जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू होत आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू मिल परिसराला भेट देऊन २२ मेपर्यंत चालणारे सर्व कार्यक्रम लोकसहभागातून यशस्वी करा, अशा सूचना केल्या.

जोतिबा यात्रेत येणाऱ्या भाविकांना आपला इतिहास आणि पूर्वजांची कार्यओळख, स्मरण व्हावे यासाठी शाहू महाराजांनी रथोत्सवाची सुरुवात केली होती. हीच परंपरा आजही सुरू आहे. हे वर्ष शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीचे वर्ष आहे. शाहू महाराजांचे कार्य लोकांपर्यंत अधिक ताकदीने पोहोचावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने कृतज्ञता पर्व समिती स्थापन करून १८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत शताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेऊन गेले महिनाभर यासाठी यंत्रणा राबत आहे.

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी शाहू मिलला भेट देऊन पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेतली. शाहू मिलमधील साफसफाईसह इतर कामाची माहिती घेऊन सूचनाही केल्या. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आढावा बैठक घेत प्रशासनाने अधिक गतिमान व्हावे, लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना केल्या. १८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत राबविण्यात येणारे उपक्रम नियोजनबद्धरीत्या चांगल्या पद्धतीने राबवा. या सर्व उपक्रमामध्ये, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी करून घ्या, अशा सूचना केल्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. ६ मे रोजी सकाळी १० वाजता १०० सेकंदांसाठी, संपूर्ण जिल्ह्यात स्तब्धता पाळण्यात येणार आहे. याची माहिती पब्लिक ॲड्रेस सिस्टम, तसेच गाव पातळीपर्यंत देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, संयोजन समितीचे आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, अजय दळवी, ऋषिकेश केसरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात

आज या कृतज्ञता पर्वाचा पहिला दिवस आहे. शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, तालीम, मंडळे, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे कार्यकर्ते आणि कोल्हापूरचे नागरिक यांच्या उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात होत आहे.

राजर्षी शाहूंच्या जयजयकारात स्मृतिस्तंभ मुंबईला रवाना

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले त्या मुंबईतील पन्हाळा लॉजच्या जागेजवळ बसविण्यात येणाऱ्या स्मृतिस्तंभाचे काम पूर्ण झाले आहे. स्मृतिस्तंभ रविवारी राजर्षी शाहूंच्या जयजयकारात मुंबईला पाठविण्यात आला. खेतवाडी-गिरगाव येथे बृहन्मुंबई महापालिकेने स्मृतिस्तंभाच्या पायाचे काम पूर्ण केले आहे. त्याठिकाणी स्तंभ बसविण्याचे काम आज, सोमवारपासून सुरू होईल. या स्तंभाचे लोकार्पण दि. ५ मे रोजी होणार आहे.

बारा फूट उंचीच्या स्मृतिस्तंभाची निर्मिती केर्ली (ता. पन्हाळा) याठिकाणी शिल्पकार ओंकार कोळेकर आणि कलाकार दीपक गवळी यांनी केली आहे. स्तंभाची संकल्पना इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची आहे. हा स्मृतिस्तंभ बेसॉल्ट दगडापासून बनविण्यात आला आहे. या स्तंभाचे पूजन रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. बबनराव रानगे यांनी स्वागत केले. इंद्रजित सावंत यांनी या स्तंभाची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर राजर्षी शाहूंच्या जयजयकारामध्ये स्तंभ ट्रकमध्ये चढविण्यात आला. यावेळी गणी आजरेकर, गुलाबराव घोरपडे, शंकरराव शेळके, प्रताप नाईक, शिल्पकार कोळेकर, कलाकार गवळी, आदी उपस्थित होते.

स्मृतींचे जतन होणार

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्या पुढाकारातून मुंबईतील खेतवाडी-गिरगाव याठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात स्मृतिस्तंभ बसविण्यात येणार आहे. या स्तंभाचे दि. ५ मे रोजी लोकार्पण करण्यात येणार असल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले. शंभर वर्षांनंतर मुंबईत स्मृतिस्तंभाची उभारणी होणार आहे. त्याद्वारे राजर्षी शाहूंच्या स्मृतींचे जतन होणार आहे. स्तंभ निर्मितीमध्ये कोल्हापूरचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे वसंतराव मुळीक यांनी सांगितले.

Web Title: Lokraja Shahu Gratitude Festival: Awakening of Gratitude Festival by Rathotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.