पहिल्या दोन तासात कोल्हापुरात ८.०४ तर हातकणंगले मतदारसंघात ७.५५टक्के मतदान
By संदीप आडनाईक | Published: May 7, 2024 10:46 AM2024-05-07T10:46:29+5:302024-05-07T10:47:16+5:30
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील मतदान केंद्रांची कंट्रोल रूममधून पाहणी केली
कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही जागांसाठी सर्वत्र शांततेत मतदान चालू असून मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत पहिल्या २ तासात कोल्हापुरात ८.०४ तर हातकणंगले मतदारसंघात ७.५५ टक्के मतदान झालेले आहे.सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक चुरस कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चुरस होती.
दोन्ही मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. काही मतदान केंद्रावर अगदी कमी उपस्थिती दिसत होती तर काही केंद्रावर रांगा होत्या. दिवसभर उन्हाचा तडाखा राहणार असल्यामुळे अनेकांनी सकाळीच मतदान करण्यासाठी घराबाहेर पडणे पसंत केले, यामध्ये महिला मतदारांचाही प्रतिसाद दिसून आला. चंदगडमध्ये नऊ वाजेपर्यंत ५.६० टक्के मतदानाची नोंद झाली. कागलमध्ये ८.९८ टक्के मतदानाची नोंद झाली. करवीरमध्ये ११.७१ टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर उत्तरमध्ये ९.६८ टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर दक्षिणमध्ये ९.६ टक्के मतदानाची नोंद झाली. राधानगरीमध्ये सकाळच्या पहिल्या दोन तासात कमी प्रतिसाद लाभला असून ३.५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती तसेच छत्रपती घराण्यातील सदस्यांनी सकाळीच कोल्हापुरातील ते राहत असलेल्या ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदान केले. आमदार सतेज पाटील, शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील, शिंदे सेनेचे उमेदवार धैर्यशील माने तसेच स्वाभिमानीचे नेते आणि उमेदवार राजू शेट्टी यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी महागावकर हायस्कूल, कसबा बावडा येथे मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील मतदान केंद्रांची कंट्रोल रूममधून पाहणी केली. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली आहे. मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर देण्यात आल्या आहेत असे सांगून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन केले आहे.