लोकसभेच्या जोरबैठका शिवाजी पेठेतून श्रीगणेशा : मंडलिकांचे स्नेहभोजन तर महाडिकांची मिसळ पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:02 AM2019-02-14T01:02:20+5:302019-02-14T01:03:12+5:30
प्रा. संजय मंडलिक यांनी चार दिवसांपूर्वी स्नेहभोजनाच्या माध्यमातून मंडलिकप्रेमी जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, तर बुधवारी खासदार धनंजय महाडिक यांनी तिथेच जाऊन मिसळ पार्टीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानातील दोन्ही मातब्बर उमेदवारांनी ऐतिहासिक
कोल्हापूर : प्रा. संजय मंडलिक यांनी चार दिवसांपूर्वी स्नेहभोजनाच्या माध्यमातून मंडलिकप्रेमी जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, तर बुधवारी खासदार धनंजय महाडिक यांनी तिथेच जाऊन मिसळ पार्टीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानातील दोन्ही मातब्बर उमेदवारांनी ऐतिहासिक शिवाजी पेठेतून जोरबैठकांना सुरुवात केली असून, त्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
आंदोलन असो की निवडणुकांच्या रणनीतीची पेरणी कोल्हापूर शहरातील पेठांतून केली की त्याचे लोन संपूर्ण शहरात पसरण्यास वेळ लागत नाही. त्यामुळेच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी शिवाजी पेठेत माजी महापौरांसह दिग्गज नेत्यांसमवेत स्नेहभोजनाचे आयोजन केले आणि प्रचाराची रणनीती ठरवली. या स्नेहभोजनाची बातमी जिल्ह्यात पसरली. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी सकाळी शिवाजी पेठेतील सव्वाशे प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत मिसळ पार्टीचे आयोजन केले.
पेठेतीलच एका हॉटेलमध्ये बसून मिसळवर ताव मारत त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. काही तरुण मंडळे व तालीम मंडळांना भेटी दिल्या. त्याचबरोबर पेठेतील माजी महापौर भिकशेठ पाटील, आनंदराव ठोंबरे, विक्रम जरग, बोंद्रे यांच्यासह अनेकांच्या घरी व परिसरातील दुकानांत जाऊन त्यांनी गाठीभेठी घेतल्या. गेले दोन दिवस त्यांनी भेटीगाठीचा कार्यक्रम राबविला असून, बुधवारी त्यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार महाडिक यांचा सत्कार अशोक जाधव, बबन कोराणे, बाजीराव चव्हाण यांनी केला.
यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण, शिरीष कणेरकर, नगरसेवक किरण शिराळे, बबन कोराणे, विकी महाडिक, विश्वास पाटील, शरद तांबट, अशोक जाधव, तुकाराम इंगवले, उत्तम कोराणे, अजित राऊत, विश्वास कळके, गजानन जरग, आदी उपस्थित होते.
कोल्हापूरच्या राजकारणात शिवाजी पेठेच्या पाठिंब्याला फारच महत्त्व आहे; कारण एकदा तिथे राजकीय हवा उठली की तिचे जिल्हाभर वादळ उठते म्हणून लोकसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार पेठेत जाऊन जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी सकाळी असाच पेठेतील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करत मिसळवर ताव मारला. यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण, नगरसेवक किरण शिराळे, शिरीष कणेरकर, बबनराव कोराणे, विकी महाडिक, विश्वास पाटील, आदी उपस्थित होते.