कोल्हापूरात कुलूप तोडून सहा तोळ्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 05:22 PM2017-10-28T17:22:05+5:302017-10-28T17:24:59+5:30
कोल्हापूर येथील शिवाजी पार्क येथे फ्लॅटचे कुलूप तोडून सहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याबाबतची फिर्याद अनिलकुमार बाळगोंडा पाटील (वय ५२) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.
कोल्हापूर , दि. २८ : येथील शिवाजी पार्क येथे फ्लॅटचे कुलूप तोडून सहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याबाबतची फिर्याद अनिलकुमार बाळगोंडा पाटील (वय ५२) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवाजी पार्क येथील शांती रेसिडेन्सीमध्ये दुसऱ्या मजल्यावर अनिलकुमार पाटील यांचा फ्लॅट आहे. तीन दिवसांपूर्वी ते कुटुंबासमवेत तिरुपती येथे देवदर्शनासाठी गेले होते.
शुक्रवारी रात्री ते तिरुपतीहून कोल्हापूरला परतले. त्यावेळी त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाच्या शटरचे कुलूप तोडून मुख्य दरवाजाच्या लॅचचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत पाटील यांनी पोलिसांना कळविले. त्यानुसार शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक संजय मोरे व पोलीस उपनिरीक्षक पवार घटनास्थळी आले.
स्वंयपाक खोलीशेजारी असलेल्या बेडरुममधील तिजोरीतील अडीच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, एक तोळ्याचे सोन्याच्या कानातील तीन जोड व अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस असा सुमारे सहा तोळ्याचा एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.
कुरिअरवाल्याने दिली माहिती
अनिलकुमार पाटील यांच्या घरी शुुक्रवारी सकाळी कुरिअरवाला पार्सल देण्यासाठी आला होता. त्यावेळी घराला कुलूप असल्याने त्याने अनिलकुमार पाटील यांच्यांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी आम्ही बाहेर गावी असल्याचे कुरिअरवाल्याला सांगितले. त्यामुळे तो तेथून गेला. त्यानंतर पुन्हा शनिवारी सकाळी कुरिअरवाला पार्सल घेऊन आला. त्यावेळी त्याठिकाणी पोलीस असल्याचे पाहिले.
कुरिअरवाल्याने ‘मी शुक्रवारी सकाळी आलो होता, तेव्हा घराला कुलूप होते’ असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे ही चोरी दुपारनंतरच झाल्याची शक्यता पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी वर्तविली आहे.