लोणार वसाहतीतील शाळा बनली डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:01 AM2019-04-25T00:01:40+5:302019-04-25T00:01:46+5:30

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जग डिजिटलाईज्ड बनत असताना महानगरपालिकेच्या शाळासुद्धा मागे नाहीत. हा प्रवास आता ...

Lonar colonial school became a digital school | लोणार वसाहतीतील शाळा बनली डिजिटल

लोणार वसाहतीतील शाळा बनली डिजिटल

Next

प्रदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जग डिजिटलाईज्ड बनत असताना महानगरपालिकेच्या शाळासुद्धा मागे नाहीत. हा प्रवास आता डिजिटलायझेशनकडे चालू आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात दैनंदिन वापरात असणाऱ्या वस्तू असोत वा शिक्षण; या सगळ्यांचे संदर्भ आणि व्याख्याच बदलली. या बदलांवर स्वार होत मुलांना अद्ययावत मार्गदर्शन करण्यासाठी लोणार वसाहत विद्यालय, शाळा क्रमांक ६८ ही ‘डिजिटल शाळा’ म्हणून ओळखण्यात येऊ लागली आहे.
कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील महानगरपालिका परिक्षेत्रातील ही शाळा होय. चुनाभट्टी परिसरातील या शाळेत बालवाडी, पहिली ते सातवीचे मराठी व सेमी-इंग्रजी माध्यमाचे वर्ग चालतात. डिसेंबर-जानेवारीमध्ये शाळेतील शिक्षक आसपासच्या बालवाडी, अंगणवाडी येथे जाऊन मुलांची यादी घेऊन येतात. नंतर शिक्षकांचे गट करून येथील परिसरात जाऊन ते शाळेच्या उपक्रमांची माहिती देण्याचे काम करतात. शाळेत शासनाच्या मोफत शिक्षणाच्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात; तसेच गरीब विद्यार्थ्यांची संमेलन फी, सहल फी किंवा त्यांना शिक्षणासाठी काही गरज लागल्यास येथील शिक्षक पुढाकार घेत असल्याने अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण येथे कमी आहे.
त्यामुळे शाळेकडे ओढा वाढू लागला; पण त्यासोबत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या स्तुत्य उपक्रमांमुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मुलांना अद्ययावत सॉफ्टवेअरसह ई-लर्निंगच्या माध्यमातून इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यांसारखे विषय शिकविले जात असल्याने विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे आकलन येते.
पुस्तकीज्ञान मिळवितानाच विद्यार्थ्यांच्या कलाप्रकारांतही ही शाळा अग्रेसर आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांमध्ये कलाप्रकारांची मूल्ये जपली जावीत, यासाठी येथे सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबविले जातात. यासाठी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन, शाळास्तरीय क्रीडा, विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. तसेच व्यवहारज्ञान मिळण्यासाठी बाजार, पोस्ट आॅफिस येथे भेट दिली जाते.
स्थानिक नगरसेविका सुरेखा शहा यांच्या प्रयत्नांमुळे शाळेचा चेहरा पूर्णपणे बदललेला आहे. त्यांच्या या उपक्रमास अनेकांनी सढळ हातांनी मदत केल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. रोटरी क्लब आॅफ गार्गीज व रोटरी इंटरनॅशनल यांनी शाळेला वॉटर प्युरिफायर दिल्याने येथील मुलांची शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. शाळेच्या परिसरात विविध फळांची झाडे लावली आहेत. ती जतन करण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतल्याने शाळेचा परिसर हिरवागार बनत आहे.

क्लासरूम कॉर्नर
शाळेतील एका कोपºयामध्ये ‘क्लासरूम कॉर्नर’ ही संकल्पना राबविली जात आहे. शास्त्रज्ञ व मान्यवरांचे माहिती फलक लावले जातात. थोर व्यक्तींच्या ओळखीबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनगुण रुजविण्यासाठी मालिका सुरू केली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलाकृती ठेवल्या जातात. तसेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य असे की, विद्यार्थी आवडीने माहिती संकलित करतात आणि स्वहस्ते लिहितात. आवडीची वस्तू या ठिकाणी ठेवतात. हा उपक्रम यशस्वी व्हावा, या उद्देशाने सर्वांना यामध्ये सहभागी करून घेतात.
शाळेचे झांज,
लेझीम पथक
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेची झांज व लेझीम अशी दोन पथके आहेत. या पथकांना विविध कार्यक्रमांवेळी मोठी मागणी आहे. विद्यार्थीही आवडीने कार्यक्रमात सहभागी होत असल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला आहे तसेच दररोज ‘संगीत परिपाठ’ हा उपक्रम राबविला जातो.

Web Title: Lonar colonial school became a digital school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.