दर्शनाची ओढ, मनामनात विठूनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 06:37 PM2021-07-20T18:37:54+5:302021-07-20T18:40:04+5:30
Pandharpur Wari Kolhapur : टाळ-मृदंगाचा नादब्रह्म, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, नामदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय..., विठ्ठल-विठ्ठल जयहरी विठ्ठलचा गजर करत मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर-नंदवाळ दिंडीने सजवलेल्या केएमटी बसमधून नंदवाळला प्रस्थान केले.
कोल्हापूर : टाळ-मृदंगाचा नादब्रह्म, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, नामदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय..., विठ्ठल-विठ्ठल जयहरी विठ्ठलचा गजर करत मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर-नंदवाळ दिंडीने सजवलेल्या केएमटी बसमधून नंदवाळला प्रस्थान केले.
आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेचे प्रतीक. विठ्ठलाच्या ओढीने टाळ-मृदंग आणि हरी नामाचा गजर करत मैलोनमैल प्रवास करणारे वारकरी, बहुजनांना आपल्या मायेच्या कवेत सामावून घेणाऱ्या विठ्ठलाचा वर्षातील सर्वात मोठा सोहळा; पण सलग दुसऱ्यावर्षी कोरोनामुळे तिकडे पंढरीची वारी थांबली आणि इतके कोल्हापूर-नंदवाळ ही पायी दिंडीदेखील वाहनातून न्यावी लागली.
सकाळी ८ वाजता विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव देशमुख, महालक्ष्मी कॅलेन्डरचे रणवीर शिर्के, ऋतुराज क्षीरसागर यांच्याहस्ते आरती झाली. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, विश्व हिंदू परिषदेचे ॲड. रणजितसिंह घाटगे यांच्याहस्ते माऊलींच्या अश्वाचे पूजन झाले. दिंडीप्रमुख ह. भ. प आनंदराव लाड महाराज व बाळासाहेब पवार, ॲड. राजेंद्र किंकर, वासुदेव संभाजी पाटील यांनी मान्यवरांना श्रीफळ आणि तुळस हार देऊन सत्कार केला.
वारीची परंपरा जपत टाळ-मृदंगाचा गजर, फुगड्या घालून, भजन, अभंग म्हणत काही पावले माऊलींची पालखी पायी नेण्यात आली. त्यानंतर पुढे फुलांनी सजवलेल्या केएमटीमध्ये पालखी ठेवण्यात आली आणि कोल्हापूर ते नंदवाळ वारीला सुरुवात झाली. वाटेवर बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारुती चौक आणि खंडोबा देवालय येथे भाविकांनी पालखी असलेल्या केएमटीवर फुलांची उधळण केली.
उभा मारुती चौकात सायबा ग्रुपच्यावतीने वारकरी बंधूंना चहा व फराळ देण्यात आला. या सोहळ्यासाठी संस्थापक-संचालक दीपक गौड, संतोष कुलकर्णी, राजेंद्र मकोटे, संभाजी पाटील, गंगाधर दास, ह.भ.प एम. पी. पाटील, संतोष रांगोळे तसेच श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा, भक्त मंडळ व जयशिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळ, राध्येय ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .
विठ्ठल मंदिरात धार्मिक विधी
कोरोनामुळे सगळी विठ्ठल मंदिरे बंद असल्याने सलग दुसऱ्यावर्षी कोल्हापूरकरांना घरातूनच विठ्ठलाला नमस्कार करावा लागला. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिराच्या बाह्य परिसरात विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विठ्ठल रूपात पूजा बांधण्यात आली होती, तर परिसरातील विठ्ठल मंदिरांतदेखील सकाळी अभिषेक, आरती असे धार्मिक विधी करण्यात आले.
मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात विशेष पूजा बांधण्यात आली होती. मंगळवारी पावसाने उघडीपच दिली नाही, त्यामुळे भाविकांना मंदिराबाहेरूनही देवाचे दर्शन घेता आले नाही. दरम्यान, घराघरात वरीचा भात, खिचडी, फळे, शेंगदाणा, राजगिऱ्याचे लाडू अशा उपवासाच्या पदार्थांची रेलचेल होती.