कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे प्राण्यांच्या हालचालींवर नजर
By admin | Published: March 5, 2015 12:44 AM2015-03-05T00:44:39+5:302015-03-05T00:44:52+5:30
वन्यजीव विभागाचा उपक्रम : राधानगरी, सागरेश्वर व सह्णाद्री व्याघ्र प्रकल्प संरक्षक क्षेत्रात
कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह राधानगरी, सागरेश्वर अभयारण्यांतील पट्टेरी वाघ, बिबट्या, गवे,
जंगली कुत्रा, हरीण, अस्वल, टस्कर हत्ती, काळा चित्ता अशा एक ना अनेक प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी कोल्हापूर वन्यजीव विभागातर्फे ४० कॅमेरा ट्रॅप्स, एक स्पीड बोट, एक लाँच खरेदी केली जाणार आहे. विशेष म्हणजे कॅमेऱ्यांद्वारे प्राण्यांच्या हालचालींसह चोरट्या शिकारीवरही अंकुश ठेवला जाणार आहे. कोल्हापूर वन्यजीव अंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्य, राधानगरी अभयारण्य, सागरेश्वर अभयारण्य ही जंगले येतात. या जंगलांत विविध प्रकारचे वन्यजीव आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी केंद्र शासन व राज्य शासन स्तरांवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत उन्हाळा व हिवाळा या दोन ऋतूंमध्ये कॉरिडॉरमध्ये असलेल्या प्राण्यांच्या हालचाली व एकूण संख्या मोजली जाते. यापूर्वी त्या प्राण्याच्या पायांच्या ठशांद्वारे मोजणी केली जात होती. मात्र, यात सुधारणा होऊन कॅमेरे ट्रॅप्स आले आहेत. यातही रिमोटद्वारे हे कॅमेरे आॅपरेट केले जातात. ही गणना भारतीय वन्यजीव संस्था (डेहराडून) व राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प संवर्धन (दिल्ली) या ठिकाणी पाठविली जाते. याकरिता अत्याधुनिक प्रकारचे कॅमेरे उपयोगात आणले जातात. सध्या या प्रकल्पांमध्ये असलेले कॅमेरे कमी आहेत. त्यानुसार नव्याने चाळीस कॅमेरे खरेदी केले जाणार आहेत. याचबरोबर या प्रकल्पांमध्ये मनोरे, कुटी आणि स्पीड बोट, लाँचचीही खरेदी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
या कॅमेऱ्याद्वारे मृत झालेला वन्यप्राणी कुठून आला हे समजते. त्याचबरोबर चोरटी शिकार करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी उपयोगी आहे. कॅमेऱ्याद्वारे अचूक इस्टिमेशन होणार आहे. वाघ, चित्ते, बिबट्या, आदी प्राण्यांची संख्या अचूक मिळणार आहे. यापूर्वी लावलेले कॅमेरे कमी असल्याने नव्याने निधी उपलब्ध झाल्यानंतर ४० नवीन कॅमेरे घेतले जाणार आहेत.
- सीताराम झुरे,
विभागीय वन अधिकारी.
असा आहे हा कॅमेरा
२४ मीटर इतक्या लांबून वन्यजिवांच्या हालचाली या कॅमेऱ्याद्वारे टिपल्या जातात. हे कॅमेरे रिमोटद्वारे वनसंरक्षक किंवा कर्मचारी लांबूनही आॅपरेट करू शकतात. याचबरोबर चोरटी शिकार, शेतकऱ्यांना उपद्रव देणारे प्राणीही शोधता येतात. या कॅमेऱ्याचा टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च अँड नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (बंंगलोर) यांनी प्रथम तेथील जंगलात वापर केला. वेगवेगळ्या आकारांत या कॅमेऱ्याची हालचाल होते.