मुरगूडमधील मराठी शाळेचं रूपडं पालटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:40+5:302021-02-06T04:45:40+5:30

मुरगूड शहरात मध्यवस्तीत असणारी आणि शेकडो विद्यार्थ्यांना घडविणारी जीवन शिक्षण मंदिर या मराठी शाळेचे रूपडे पालटले आहे. मुरगूड येथील ...

The look of the Marathi school in Murgud changed | मुरगूडमधील मराठी शाळेचं रूपडं पालटलं

मुरगूडमधील मराठी शाळेचं रूपडं पालटलं

Next

मुरगूड शहरात मध्यवस्तीत असणारी आणि शेकडो विद्यार्थ्यांना घडविणारी जीवन शिक्षण मंदिर या मराठी शाळेचे रूपडे पालटले आहे. मुरगूड येथील पण सध्या ॲन्टन पार (Anton Paar) इंडिया प्रा. लि.मध्ये झोनल मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे अभिजित सदाशिव यादव यांनी सुमारे १५ लाख कंपनीकडून या शाळेला देऊ केले आहेत. त्यामुळे दयनीय अवस्थेत गेलेली या शाळेची इमारत कात टाकून अत्यंत आकर्षक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळा नं. १ चा माजी विद्यार्थी अभिजित सदाशिव यादव (एमएससी, एमबीए) यांच्यामुळे हा कायापालट शक्य झाला आहे. यादव यांच्या पाठपुराव्यामुळे ॲन्टन पार इंडिया प्रा. लि. या कंपनीने काॅर्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलिटी (CSR Fund) याद्वारे येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळेच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी १५ लाखांचे लाखमोलाचे अर्थसाहाय्य दिले आहे.

या निधीतून शाळेच्या पूर्वेकडील दोन वर्ग व व्हरांडा छताची दुरुस्ती, शौचालय, मुतारी, हात धुण्यासाठीच्या ठिकाणाचे बांधकाम, कंपाैंड दुरुस्ती, बांधकाम, वर्गखोल्यांतील व व्हरांड्यातील फरशी दुरुस्ती, वर्गखोल्यांतील भिंतींचा गिलावा करण्यात आला. वीजव्यवस्थेचे नूतनीकरण, प्लंबिंग काम, वर्गखोल्यांत ग्रीन बोर्डस, ग्रंथालय निर्मिती, ॲक्वागार्ड पाण्याची सोय, मुलांच्या मनोरंजनासाठी बागेमध्ये खेळाचे साहित्य, बागकाम, दरवाजे, खिडक्यांची दुरुस्ती व जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. व्हरांड्याच्या भिंतीवर स्वच्छता, व्यायाम, सामाजिक प्रश्न या गोष्टी प्रामुख्याने अधोरेखित केल्या. संपूर्ण इमारतीच्या रंगकामामध्ये ‘बोलक्या भिंती’ ही संकल्पना राबविली. यामुळे सतत या गोष्टी मुलांसमोर राहणार आहेत. अभिजित यादव यांच्या पाठपुराव्यामुळे ॲन्टन पार कंपनीच्या दातृत्वातून शाळेने जणू कातच टाकली आहे.

...........................

फोटो : मुरगूड (ता. कागल) येथे जीवनशिक्षण मंदिर, शाळा नंबर १ या शाळेचे रूपडे असे पालटले आहे.

Web Title: The look of the Marathi school in Murgud changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.