स्मार्ट व्हायचं की... दृष्टीक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:18 AM2018-12-25T01:18:09+5:302018-12-25T01:18:46+5:30
परवा गावी गेलो होतो. सीमाभागातील महाराष्टÑ-कर्नाटक सीमेवरील गाव. लोकूर त्याच नाव. गावची यात्रा असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रम, शर्यतींची रेलचेल होती. तरुणाई उत्स्फूर्तपणे सर्वत्र
- चंद्रकांत कित्तुरे
परवा गावी गेलो होतो. सीमाभागातील महाराष्टÑ-कर्नाटक सीमेवरील गाव. लोकूर त्याच नाव. गावची यात्रा असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रम, शर्यतींची रेलचेल होती. तरुणाई उत्स्फूर्तपणे सर्वत्र पुढाकार घेताना दिसत होती. एखाद्याला बोलावणे, काहीतरी आणायला सांगणे, एखादा निरोप देणे, छायाचित्रण करणे, चित्रीकरण म्हणजेच व्हिडीओ शूटिंग करणे अशी बरीच कामे मोबाईलद्वारे केली जात होती. त्यातून मोबाईल विशेषत: स्मार्टफोनच महत्त्व अधोरेखीत होत होते. खरंचं आज मोबाईल ही जीवनावश्यक बाब बनली आहे.
‘अन्न’, ‘वस्त्र’, ‘निवारा’ या मूलभूत गरजांमध्ये आता ‘मोबाईल’चाही समावेश करावा लागेल अशी स्थिती आहे. कारण प्रत्येकाचं पान मोबाईलशिवाय हालत नाही हे जरी खरं असलं तरी या मोबाईलचा वापर कोणत्या गोष्टींसाठी करायचा, कोणत्या नाही हे समजून घेण्याची, सांगण्याची गरज आहे. गावातीलच बहिणीने आपल्या मुलाबद्दल तक्रार केली की मोबाईल हातातून खाली ठेवतच नाही. त्याला जरा सांग असंही ती म्हणाली. त्याला काय सांगायचं, या विचारात असतानाच त्याच्या आजोबांनी एक घटना सांगितली. शेजारच्या एका गावातील माध्यमिक शाळेत पालकसभा होती. शाळेतील मुला-मुलींसोबत त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी पालकांमधील कुणाला काही बोलायचे असेल तर बोलावे, असे आवाहन केले.
यावेळी एक पालक उठून उभे राहिले अन् सांगू लागले ‘माझी अमूक-अमूक मुलगी. तिला स्मार्ट फोन घेऊन दिलाय. हट्ट करून तिने तो द्यायला लावला. तो दिल्यापासून सतत तिच्या हातात तो मोबाईल अन् डोळे त्या मोबाईलमध्ये खुपसलेले असत्यात. ती त्यावर काय बघते, काय-काय करते आमाला काय बी कळत नाही. आईने एखादे काम सांगितले तरी चिडचिड करते, आम्ही किती सांगितले तरी ऐकत नाही. आम्ही आता काय करायच तुम्हीच सांगा.’ आपल्या वडिलांनी भरसभेत आपले नाव घेऊन लावलेले हे बोल ऐकून त्यांच्या मुलीला रडू कोसळले. ती रडताना पाहून तिच्या मैत्रिणीच्या डोळ्यांतही अश्रू आले. झाले पालक सभेचा नूरच पालटला. वातावरण गंभीर झाले.
आजोबांनी उठून त्या पालकांना थांबविले. सभा संपल्यानंतर ती मुलगी आणि तिच्या वडिलांशी या आजोबांनी संवाद साधून आपली पिढी आणि नवी पिढी तिच्या आवडी-निवडी याविषयी चर्चा करून नव्या पिढीला समजून घ्या, असे सांगताना त्या मुलीलाही चार गोष्टी सांगितल्या. जे तिथे घडले तेच इथेही चाललंय काय करायचं, असा आजोबांचा मला सवाल? मी तरी काय सांगणार. मोबाईल तर प्रत्येकाचा जीव की प्राण झालाय. फक्त त्यातल काय घ्यायच आणि काय नाही हे कळलं की झालं. टी. व्ही. आला त्यानंतरही असचं झालं होत. सर्वजण ‘इडियट बॉक्स’ म्हणून तो कसा वाईट आहे. त्यामुळे वेळ कसा आणि किती वाया जातो. लोक कामधाम सोडून टीव्हीच पाहात बसतात असे आक्षेप घेतले जात होते. काहीअंशी ते खरेही होते पण काळाप्रमाणे बदलते तंत्रज्ञानही अनुकरले जाते. अंगवळणी पडते आणि लोक दुष्परिणाम विसरूनही जातात.
आता टी.व्ही.ला ‘इडियट बॉक्स’ म्हणताना कोणी दिसत नाही. आज टी.व्ही. तर घराघरांत आहेच; पण त्याचा नवा अवतार मोबाईलही प्रत्येकाच्या घरातच नव्हे तर हातात आहे यात काय नाही. टी.व्ही.त फक्त चॅनेलच दिसायची. मोबाईलमध्ये चॅनेल काय, व्हिडिओ काय, गाणी काय, नाटक काय सर्व काही दिसते शिवाय तो संगणकाचेही काम करतो. संदेशाच्या देवाण-घेवाण तर एकदम सोपी. तुम्ही कुठेही असा तुमच्याशी कुणीही थेट बोलू शकतो, तुम्हाला बघू शकतो. तुमच्याशी संवाद साधू शकतो. त्याचवेळी याचे दुष्परिणामही लक्षात घ्यायला हवेत. कारण मोबाईलमुळे माणसा-माणसांतील संवाद हरवत चालल्याचे चित्र आहे. कारण कुठेही जा भेटल्यानंतर काहीवेळांतच मोबाईल उघडून बघत बसतो नाहीतर सारखे त्यात डोकावत राहतो. काल-परवाचीच बातमी मोबाईलमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे सांगणारी होती. महिलांच्यादृष्टीने तर मोबाईल म्हणजे सवत बनली आहे, असे काहीसे त्यात म्हटले होते.
एकमेकांचा मोबाईल पती-पत्नीला हाताळता येत असेल त्याची मुभा असेल तर अविश्वासाचे वातावरण निर्माण होणार नाही पण ती मुभा नसेल तर ती किंवा तो कुणाशी बोलतोय. त्यांच्यात काय चॅटिंग चालतंय याबाबत मनाचे मांडे खाणे किंवा मनोराज्ये रचणे याव्यतिरिक्त काही करता येत नाही. त्यातूनच गैरसमज निर्माण होतात. ते वेळीच दूर झाले तर ठीक अन्यथा अविश्वास वाढत जावून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. त्यामुळे स्मार्टफोन वापरायला हवाच पण त्याचा वापर करून स्वत: स्मार्ट व्हायचे की स्वत:ला बरबाद करून घ्यायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे.
kollokmatpratisad@gmail.com