जत्रा ! देवीच्या पुजेनंतर कोहळा मिळविण्याच्या हुल्लडबाजीत तीन तरुण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:25 PM2019-10-03T17:25:47+5:302019-10-03T17:26:59+5:30

त्र्यंबोली यात्रेतील प्रकार : पोलिसांकडून लाठीमार

Look! Three youths injured in riot clash in kolhapur ambabai fair | जत्रा ! देवीच्या पुजेनंतर कोहळा मिळविण्याच्या हुल्लडबाजीत तीन तरुण जखमी

जत्रा ! देवीच्या पुजेनंतर कोहळा मिळविण्याच्या हुल्लडबाजीत तीन तरुण जखमी

Next

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ्यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या हुल्लजबाजीत दोन तरुण व त्या आधीच झालेल्या मारामारीत एक तरुण असे तीघेजण जखमी झाली. हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. कोहळ्याचे तुकडे घरी नेल्याने संपत्ती वाढते असा समज असल्याने तो मिळवण्यासाठी ही धडपड असते मात्र ही समजून अत्यंत चुकीची असून तिला धार्मिक आधार नसल्याचे तज्ञांनी सांगितले.  

गुरूवारी सकाळी दहा वाजता श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी व गुरूमहाराजांची अशा तीन पालख्या त्र्यंबोली टेकडीला निघाल्या. भाविकांना भेटी देत दुपारी साडे बारा वाजता या पालख्या त्र्यंबोलीवर पोहोचल्या. दरम्यान खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे व शहाजीराजे यांचेही मंदिर परिसरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते गुरव कुटूंबातील सलोनी विनायक गुरव या कुमारिकेचे पूजन झाले. तिच्या हस्ते कोहळ््याला त्रिशुळ लावताच कोहळा मिळवण्यासाठी हुल्लजबाजीला सुरूवात झाली. दरवर्षी ठरावीक तरुणांकडून हे प्रकार केले जाते. यंदा त्यात तृतीयपंथियांनीही सहभाग घेतला होता. 

मंदिराभोवतीने सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. कोहळा मिळालेल्या तरुणामागे सगळे धावत सुटल्याने सोहळा पाहण्यासाठी आलेल्या महिला, बालके यांच्यासह भाविकांचीही पळापळ होत होती, भीतीदायक वातावरण होते. पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही हे शक्य झाले नाही.  काहीही करुन कोहळा मिळवायचाच या तयारीने हे तरुण आले होते. या सगळ््या झाटपटीत दोन तरुण जखमी झाले. त्यानंतर बाहेर मात्र पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेण स्विकारले. त्यातच कोहळयाचा एक भाग अंबाबाईच्या पालखीत पडला. कोहळा पालखीत पडल्यानंतर त्यातला अर्धा भाग तरुणांना दिल्यानंतर वातावरण निवळले. दिडच्या दरम्यान तीनही पालख्या परतीच्या मार्गाला निघाल्या. 
----------------
सोहळ्याची पार्श्वभूमी...
शारदीय नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला कोल्हापुरची अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. अंबाबाईने कोल्हासुराचा अंत केल्यानंतर साजरा करण्यात आलेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीचा बोलवायचे राहिल्याने ती रुसून अंबाबाईकडे पाठ फिरवून बसली. हे लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीला गेली. यावेळी त्र्यंबोली देवीने अंबाबाईला तू कोल्हासुराचा वध कसा केलास ते दाखव अशी विनंती केली. ही मान्य करत अंबाबाईने राक्षसाचे प्रतिक म्हणून कोहळ््याचा वध करून दाखवला. त्यामुळे या दिवशी गुरव घराण्यातील मुलीच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा फोडला जातो. 
-----------------------------------
कोहळा फुटुच दिला नाही....
सोहळा सुरू होण्यापूर्वी मंदिराशी संबंधित यंत्रणेने या सोहळ््याभोवती बॅरीकेटींग करण्याची सुचना पोलिसांना केली होती. मात्र ते पोलिसांनी केले नाही.  ज्यासाठी ही यात्रा होते तो कोहळाच यंदा फुटू दिला गेला नाही. गुरव कुटूंबातील मुलीने कोहळ््याला त्रिशुळ लावताच तो अख्खा पळवण्यात आला. कोहळा राक्षसाचे प्रतिक असल्याचे लोंकांना ते समजावे व तो मिळवण्यासाठी हुल्लडबाजी होवू नये म्हणून त्यावर राक्षसाचे चित्रही काढण्यात आले होते. तरी हा प्रकार थांबला नाही. 
---------------
कोहळा फोडण्याचा घरी नेण्याच्या या प्रकाराला कोणतेही धार्मिक संकेत नाहीत. राक्षस म्हणून कोहळ््याचा वध केला जातो. तो घरी नेणे म्हणजे राक्षसाच्या अवयवयाचे तुकडेच घरी नेण्याचा प्रकार आहे. त्यामुळे तो मिळवण्यासाठी केली जाणारी हुल्लडबाजी बंद व्हावी.
अ‍ॅड. प्रसन्न मालेकर (मंदिर अभ्यासक)
 

Web Title: Look! Three youths injured in riot clash in kolhapur ambabai fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.