कोठडी भरण्यासाठी वाट कशाची बघताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:25 AM2018-04-24T01:25:38+5:302018-04-24T01:25:38+5:30

Looking to wait for the car? | कोठडी भरण्यासाठी वाट कशाची बघताय?

कोठडी भरण्यासाठी वाट कशाची बघताय?

Next


कोल्हापूर : कोठड्या भरण्यासाठी तुम्ही वाट कशाची पाहताय..? भरा ना. आमची काही हरकत नाही. उलट तुरुंगातून जाऊन आल्यावर पुढची निवडणूक सोपी जाते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. मंत्री पाटील यांनी जनतेतून निवडणूक लढवावी म्हणजे त्यांना शिकायला मिळेल, असाही टोमणाही त्यांनी मारला.
हल्लाबोल करून सरकारवर खोटे आरोप करीत असाल तर याद राखा. छगन भुजबळ यांच्या शेजारच्या दोन कोठड्या अजून शिल्लक आहेत,असा इशारा मंत्री पाटील यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिलला मुंबईत झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांवर पवार यांनी वरील प्रत्युत्तर दिले.
यावेळी आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, राजेंद्र यड्रावकर, बाबूराव हजारे, अनिल साळोखे, अनिल कदम, अनिल घाटगे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही एकत्र राहू की नाही याची लोकांना काळजी
देशात गेल्या वर्षभरात झालेल्या १० निवडणुकांपैकी आठ ठिकाणी भाजपचा पराभव झाला. जनता सत्ता बदल करण्यासाठी उत्सुक आहे; परंतु आम्ही एकत्र राहू की नाही, याचीच लोकांना काळजी वाटत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळेच आम्ही ज्या राज्यात ज्या पक्षाचा प्रभाव आहे, त्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून लोकांना विश्वास द्यायचा व भाजपला सत्तेबाहेर घालविण्याचा प्रयत्न आहे.
के. पी. शेजारीच बसा...
के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून संघर्ष सुरू आहे. पत्रकार परिषदेला पवार आल्यानंतर के. पी. हे डाव्या बाजूच्या समोरील खुर्चीवर बसत होते; परंतु ए. वाय. पाटील यांनी त्यांना बोलावून घेतले व मुश्रीफ यांच्या शेजारी बसा, असे सुचविले. ते पाहून पवार यांनी के. पी. त्यांच्या (म्हणजे ए. वाय.) शेजारीच बसा, असे म्हणताच जोरदार हशा पिकला.

Web Title: Looking to wait for the car?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.