देवस्थानच्या पावतीवर भाविकांची लूट

By admin | Published: September 15, 2015 01:23 AM2015-09-15T01:23:46+5:302015-09-15T01:23:46+5:30

अंबाबाई मंदिर : दहा रुपयांच्या पावत्या, चौकशीची मागणी; तक्रार आल्यास चौकशी करण्याचे आश्वासन

Loot of devotees on the receipt of the temple | देवस्थानच्या पावतीवर भाविकांची लूट

देवस्थानच्या पावतीवर भाविकांची लूट

Next

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पावतीचा वापर करून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची लूट सुरू असल्याचे प्रकरण सोमवारी उघडकीस आले. देवस्थान समितीतीलच यंत्रणेकडून ही लुबाडणूक सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण त्याशिवाय समितीचा अधिकृत शिक्का असलेल्या पावत्या भाविकांना कशा दिल्या गेल्या, अशी विचारणा होत आहे.
जेव्हा देवस्थान समिती भाविकांना लाडूचा प्रसाद देत होती तेव्हा ही दहा रुपयांची पावती दिली जात होती परंतु हा प्रसादच आता बंद आहे. या पावत्या देऊन महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या मोफत अन्नछत्राकडे भाविकांना पाठविण्यात येत आहे. ही भाविकांची शुद्ध लुबाडणूक आहे. मंदिराच्या दारात उभे राहून या पावत्या देऊन दहा रुपये घेणारी यंत्रणाच गेली अनेक दिवस कार्यरत आहे. शनिवारी व रविवारी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. त्यावेळी भक्त मंडळाच्या अन्नछत्राच्या तिथे या पावत्यांचा ढीग पडलेला आढळतो. सोमवारी यातील एक पावती शिवाजी पेठेतील जागरूक सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट यांना मंदिराच्या प्रवेशद्वारात मिळाली. या पिवळ््या पावतीवर तारीख नाही परंतु २९३१२ असा क्रमांक आहे. याचा अर्थ तेवढ्या पावत्या आतापर्यंत वाटल्या गेल्या असल्याची शक्यता आहे. ही पावती घेऊन त्यांनी समितीच्या सचिव शुभांगी साठे यांची भेट घेतली व विचारणा केली परंतु त्यांनाही त्याचे नीट उत्तर देता आले नाही. पावतीवर ‘प्रसाद कुपन’ म्हटले आहे. त्यावर समितीचा गोल शिक्का मारलेला आहे. याचा अर्थ समितीच्या कार्यालयाकडूनच त्याचे वाटप केले जात असणार हे देखील स्पष्टच आहे.
महालक्ष्मी भक्त मंडळाचे कार्यवाह राजू मेवेकरी म्हणाले, ‘गेले वर्षभर अशा पावत्या घेऊन भाविक आमच्या अन्नछत्रामध्ये येतात. भक्तमंडळाचे अन्नछत्र ही मोफत सेवा आहे; परंतु भाविकांना मात्र त्यासाठी दहा रुपये द्यावे लागत असल्याचा समज होतो हे चुकीचे आहे.’
देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे म्हणाल्या, ‘या पावत्या खऱ्याच आहेत व त्या देवस्थान समितीमार्फतच दिल्या जातात. त्यावर समिती अभिषेक किंवा तत्सम विधी करण्यासाठी आलेल्या भाविकांना प्रसादाच्या रूपाने भोजन देते. त्या भाविकासमवेत अन्य व्यक्ती असल्यास त्यासाठी ३० रुपये घेतले जातात. मंदिराच्या आवारातच हे भोजन दिले जाते परंतु तरीही या पावत्यांबाबत काही तक्रार असल्यास त्याची चौकशी केली जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: Loot of devotees on the receipt of the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.