जाती-पातीची बंधने झुगारा : पाटील-बडदारे
By admin | Published: September 8, 2015 11:53 PM2015-09-08T23:53:35+5:302015-09-08T23:53:35+5:30
'स्पार्क लघुपट महोत्सव' : शिवाजी विद्यापीठात तरुणाईची गर्दी
कोल्हापूर : सुशिक्षित तरुणाईने समाजमनात खोलवर रूजलेली जाती-पातीची बंधने झुगारून दिली तरच एक आदर्श मानवतावादी समाजव्यवस्था आकाराला येईल, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या मंगला पाटील-बडदारे यांनी सोमवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन विभाग व अॅन अनुप जत्राटकर मल्टिमीडिया प्रॉडक्शन्सतर्फे आयोजित ‘स्पार्क लघुपट महोत्सव-२०१५’च्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. मानव्यविद्या सभागृहातील या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. ज. रा. दाभोळे होते. मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी निर्भय उलस्वार याच्या ‘हुलड’ या आॅनर किलिंगवरील लघुपटाच्या प्रीमिअरने महोत्सवाचे उद्घाटन झाले. डॉ. दाभोळे म्हणाले, आॅनर किलिंगच्या घटना म्हणजे भारतीय समाजाला लागलेले लांच्छन आहे. या प्रश्नांसंदर्भात विचार करत असताना त्याची उत्तरेसुद्धा असतात पण, ती मिळवायची की नाही, हा मात्र संपूर्णत: आपलाच प्रश्न आहे. कार्यक्रमात ‘हुलड’ लघुपटाच्या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत केले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. निर्भय उलस्वार यांनी आभार मानले.
महोत्सवास अभिनेते मिलिंद ओक, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. सुमेधा साळुंखे , दीपक कुन्नुरे, अनुप जत्राटकर, प्रसाद ठाकूर, डॉ. अनमोल कोठडिया, डॉ. शिवाजी जाधव, राजश्री साकळे , धनंजय पोलादे, सुरेश पाटील, स्रेहलराज, शेखर गुरव, उमेश देवकर, जयेंद्र राणे, रणजित गायकवाड, चैतन्य गुजर, रणजित माने, संगीतकार रवींद्र सुतार, कलादिग्दर्शक सुंदरकुमार आदी उपस्थित होते.
महोत्सवासाठी श्वेता किल्लेदार, सानिका मुतालिक, अभय उलस्वार, सागर सावंत, राहुल गडकर, दुर्वा दळवी, कविता राजपुरोहित यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
महोत्सवात विविध लघुपटांचे प्रदर्शन
या महोत्सवात चैतन्य डोंगरे व सुशांत पाटील यांचा ‘चेतना’, महादेव कांबळे यांचा ‘अभंग काळोखाचा’, हरिष कुलकर्णी यांचा ‘अ गणेश उत्सव’, प्रसाद ठाकूर यांचा ‘चेस’ आणि अनुप जत्राटकर यांच्या ‘फिशी लाइफ’ व ‘स्मोकिंग झोन’ या लघुपटांचे प्रदर्शन झाले.