जैव कचऱ्यासाठी होते डॉक्टरांची लूट : कोल्हापूर स्थायी सभेत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 09:53 PM2018-06-08T21:53:43+5:302018-06-08T21:53:43+5:30

 Looted doctor for bio-waste: Complaint in Kolhapur standing committee | जैव कचऱ्यासाठी होते डॉक्टरांची लूट : कोल्हापूर स्थायी सभेत तक्रारी

जैव कचऱ्यासाठी होते डॉक्टरांची लूट : कोल्हापूर स्थायी सभेत तक्रारी

Next
ठळक मुद्दे१७ जूनपर्यंत जागा ताब्यात घेणार

कोल्हापूर : नेचर अ‍ॅँड नीड कंपनी पैसे घेतल्याशिवाय रुग्णालयातून जैवकचऱ्याचा उठाव करीत नाही. महापालिकेने ३०० रुपये दर ठरविला असताना कंपनी प्रत्येक डॉक्टरकडून तीन हजार वसूल करते व त्याबद्दल डॉक्टरांच्या तक्रारी वाढल्या असल्याची तक्रार शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.

हा विषय सदस्य कविता माने, राहुल माने, सत्यजित कदम व डॉ. संदीप नेजदार यांनी उपस्थित केला. या कंपनीने महापालिकेचे भाडे भरले नसेल तर ते सील करा. सर्व डॉक्टरांना पैसे वर्षाचे एकदम न देता महिन्याचेच द्या, अशा सूचना करण्याची मागणी सदस्यांनी केली. कंपनीबाबत तक्रारी देण्यासाठी डॉक्टर्स पुढे येत नाहीत. १७ जूनपर्यंत महापालिकेने ही जागा ताब्यात घेण्याबाबत संबंधित कंपनीस नोटीस दिली आहे. तिची मुदत १७ जूनला संपत आहे. त्यानंतर जर जागा ताब्यात दिली नाही तर ती सील केली जाईल. आयुक्तांनी यापूर्वीच सर्वांनी महिन्याचेच पैसे भरावेत असे स्पष्ट केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

महापालिकेच्या वतीने डेंग्यूबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. टायरजप्तीची कारवाई सुरू आहे. प्रबोधनात्मक पत्रक वाटण्यात येत आहेत. व्हॉट्स अ‍ॅपवर डॉक्युमेंटरी तयार करून प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सविता घोरपडे व राहुल माने यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. पांडुरंगनगरी प्रभागातील दोन चॅनेलची सफाई मंगळवारपर्यंत पूर्ण करून घेऊ, असे दीपा मगदूम यांच्या प्रश्नांवर स्पष्ट करण्यात आले. राजारामपुरीतील गळती काढण्याचे नियोजन केले असल्याचे प्रतिज्ञा निल्ले यांच्या तक्रारीवर प्रशासनाने सांगितले.

बॅडमिंटन हॉलची दुरुस्ती
टाकाळा येथील बॅडमिंटन हॉलची ठेकेदाराकडून तातडीने दुरुस्ती करून घेतली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली. या हॉलमधील फरशा उकलल्या आहेत व त्यामुळे खेळाडूंना त्याचा त्रास होत असल्याची तक्रार सदस्यांनी केली होती.

दहा हजार झाडे लावणार
महापालिकेच्या वतीने पावसाळ्यात दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक सदस्याला आपल्या प्रभागात लावण्यासाठी १ जुलैपासून २५ झाडे देण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली.

१७ कंटनेर ५० टक्क्यांपेक्षा जास्त खराब
महापालिकेचे १७ कंटनेर ५० टक्क्यांपेक्षा जास्त खराब असल्याची माहिती सभेत देण्यात आली. रोज तीन कंटेनर दुरुस्त केले जात आहेत. मोठ्या प्रमाणात दुरुस्ती असल्यास दोनच कंटेनर दुरुस्त होतात. स्टोअरकडे ३५ कंटेनर जमा आहेत. जसजसे कंटेनर दुरुस्त होतील तसतसे दुसºया ठिकाणचे उचलून दुरुस्त करून ठेवण्याचे नियोजन करीत असल्याचे सांगण्यात आले.

कुत्री पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी घेणार
शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी घेण्याबाबतचा प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. सध्या तीन कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी आणखी दोन कर्मचारी देऊन पाच कर्मचाºयांचे पथक तयार केले आहे. पिसाळलेली कुत्री पकडण्यासाठी अग्निशमन विभागाची मदत घेतली जात आहे, असे सांगण्यात आले. हा मुद्दा गीता गुरव यांच्यासह स्वत: सभापती ढवळे यांनीही उपस्थित केला. हा विषय आम्ही दोन वर्ष मांडतो; परंतु अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. आपल्याकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने यासाठी बाहेरून प्रशिक्षित कर्मचारी घेण्यात यावेत. शहरात कुत्री हजारोंनी आहेत. कुत्रे चावल्यास नगरसेवकांना पहिला फोन येतो. नागरिकांना याबाबत कार्यालयाचा फोन नंबर जाहीर करावा व तातडीने १० कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्याचा आग्रह सदस्यांनी धरला.

रक्तपेढीचे फक्त स्थलांतर
महापालिकेची रक्तपेढी बंद होणार नसून तिचे फक्त स्थलांतर होणार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने केले. डॉ. नेजदार व कविता माने यांनी त्यासंबंधी खुलासा करण्याची मागणी केली.

आमदार सतेज पाटील यांच्या विकास निधीतून टाकाळा येथे बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात आले आहे. या टाकाळा हॉलचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या सुरुवातीपासून तक्रारी होत्या. तसेच वूडन कोर्टची बांधणी नियमाप्रमाणे केलेली नाही. याबाबत आमदार पाटील यांच्याकडे खेळाडूंनी तक्रारी केल्या होत्या. पाटील यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.
 

Web Title:  Looted doctor for bio-waste: Complaint in Kolhapur standing committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.