‘जीवनदायी’ची खासगी रुग्णालयांकडून लूट
By admin | Published: October 4, 2016 12:30 AM2016-10-04T00:30:04+5:302016-10-04T00:57:53+5:30
अभ्यागत समितीची बैठक : क्षीरसागर यांचा आरोप; कॅन्सर सेंटर उभारणीसाठी ‘टाटा’ व्यवस्थापनाशी चर्चा
कोल्हापूर : राजीव गांधी जीवनदायी योजनेत बराच गोंधळ असून, खासगी रुग्णालयांकडून शस्त्रक्रियेची गरज नसताना रुग्णांकडून लूट होत असल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी सीपीआरमध्ये झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत केला. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. सीपीआरमध्ये कॅन्सर सेंटर होण्यासाठी टाटा व्यवस्थापनाबरोबर लवकरच चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सीपीआरमधील कामकाजाचा आढावा घेताना अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सिटी स्कॅन व ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्णत्वास आले आहे. जीवनदायी आरोग्य योजना, वर्ग - ४ ची १०४ रिक्त पदे, लोकसहभागातून यंत्रसामग्री मिळावी, शेंडा पार्क येथील बांधकाम, स्तन कर्करोग मोफत तपासणी अभियानाची माहिती दिली. वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्र्यांशी चर्चा करून सिटी स्कॅन व ट्रामा केअर सेंटरचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. जीवनदायी योजनेत प्रचंड गोंधळ आहे, खासगी रुग्णालयाकडून गरज नसताना शस्त्रक्रिया करणे, उपचार न करता अवाजवी खर्चाची बिले देऊन सरकारची फसवणूक सुरू आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अधिकृत पत्राची सक्ती करण्याबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत सीपीआरसाठी सरकारकडून निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली. अभ्यागत समितीचे सदस्य अजित गायकवाड, सुनील करंबे, सुभाष रामुगडे, डॉ. बसरगे, डॉ. काटकर, सिटी स्कॅनचे डॉ. संजय देसाई, डॉ. अजित लोकरे, डॉ. बडे, डॉ. मिसाळ, राजीव गांधी योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे उपस्थित होते.
सीपीआरमध्ये सोमवारी अभ्यागत समितीची बैठक झाली. त्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.