पोलिस असल्याची बतावणी करून लूटमार; आंतरराज्यीय टोळीस कोल्हापुरात अटक
By उद्धव गोडसे | Published: September 20, 2023 04:57 PM2023-09-20T16:57:06+5:302023-09-20T16:57:45+5:30
१८ गुन्ह्यांची उकल, ३३ तोळे दागिन्यांसह २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करून, तसेच जबरी चोरी आणि फसवणूक करणा-या आंतरराज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीने महाराष्ट्र आणि कर्नाटकात केलेल्या १८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, ३२८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली.
बागरअली अहमदअली (वय ३१, रा. परळी वैजनाथ, ता. परळी, जि. बीड), मुजाहीदअली मिस्कीलअली (वय ३४) आणि गुलामअली फरिद्दीन इराणी (वय ४०, रा. दोघे रा. बिदर, राज्य कर्नाटक) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. चौथा संशयित मुसौडीअली राजूअली (रा. परळी वैजनाथ) हा पसार झाला, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत दिली.
कागल येथील गणेश नगरमध्ये दोन सप्टेंबरला चोरट्यांनी एका वृद्धाला वाटेत अडवून त्यांच्याकडील सोन्याची चेन, अंगठी आणि साडेपाच हजार रुपयांची रोकड पळवली होती. त्याच दिवशी हुपरी येथे एका वृद्धास अडवून पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी जबरदस्तीने त्यांच्याकडील अंगठी काढून घेतली होती. या दोन गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला संशयित इराणी टोळीची माहिती मिळाली. या टोळीतील संशयित तावडे हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच, पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली.
अधिक चौकशीत त्यांनी जिल्ह्यात जबरी चोरीचे सात, पोलिस बतावणीचे सहा, फसवणुकीचे तीन, तर दुचाकी चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील दोन दुचाकींसह ३२८ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.