जोतिबा डोंगरावर पार्किंगमधून लूट, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 05:22 PM2022-09-21T17:22:10+5:302022-09-21T17:27:02+5:30
बेळगाव येथील एका शाळेची सहल घेऊन आलेल्यांना हा अनुभव आला. त्याचा त्यांनी केलेला व्हिडीओ संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
कोल्हापूर : जोतिबा डोंगरावर पार्किंगच्या नावावर लूट असल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. तसेच ठेकेदाराचे कर्मचारी दादागिरी करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. बेळगाव येथील एका शाळेची सहल घेऊन आलेल्यांना हा अनुभव आला. त्याचा त्यांनी केलेला व्हिडीओ संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
बेळगावहून २५ विद्यार्थ्यांना घेऊन एक टेम्पो ट्रॅव्हलर जोतिबा दर्शनासाठी आला होता. यावेळी चालकाकडे २०० रुपयांची मागणी करण्यात आली. यावेळी कशाचे दोनशे रुपये अशी विचारणा केल्यानंतर २५ मुलांचे १२५ रुपये ग्रामपंचायत कराचे म्हणून सांगण्यात आले. तर ७५ रुपये पार्किंगचे म्हणूनही सांगण्यात आले; परंतु याचा उल्लेख पावतीमध्ये नाही असे चालक सांगत होता. यावरून कर्मचारी आणि त्याच्यात वादही झाला.
नंतर त्याने दुसऱ्याला बोलावून घेतले. त्यावेळी चित्रीकरण करणाऱ्या बेळगावहून आलेल्या व्यक्तीचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित व्यक्तीने मी वाहतूक सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे असे सांगून सर्व मुलांना खाली उतरवून रस्त्यावर बसवण्याचा इशारा दिला. हे सर्व चित्रीकरण झाल्याचा व्हिडीओ संध्याकाळपर्यंत सर्वत्र व्हायरल झाला. जोतिबावर नेहमीच या सर्वांची दादागिरी असल्याच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या. अशांमुळे जोतिबा देवस्थानची, कोल्हापूरची बदनामी होत असल्याच्याही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या आहेत.
जिल्हा परिषद काय करणार
जोतिबा ग्रामपंचायत ही जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते. त्यामुळे जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग हा व्हिडीओची दखल घेऊन काही चौकशी करणार का अशी विचारणा होत आहे.