महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:01 PM2020-05-30T17:01:47+5:302020-05-30T17:12:24+5:30
महामार्गावर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा बोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सातारा : महामार्गावर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा बोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अनिकेत चंद्रकांत जाधव (वय १९, रा.सदर बझार सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, टेम्पो चालक रेहमान नदाफ (रा. संजयनगर, सांगली) हा १९ मे रोजी टेम्पोने पुण्याहून सांगलीकडे शेतीची औषधे घेऊन निघाला होता. यावेळी रात्री आठच्या सुमारास बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत तो लघुशंकेसाठी थांबला होता. त्यानंतर काही वेळात तो पुन्हा ट्रकमध्ये बसला असता तेथे दुचाकीवरून तीन युवक आले.
टेम्पोला दुचाकी आडवी मारून त्यांनी चालकाकडे पैसे मागण्यास सुरूवात केली. चालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांपैकी एकाने रेहमान नदाफ याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्यांच्याकडील सहा हजारांची रोकड आणि मोबाइल घेऊन त्यांनी पलायन केले होते.
या प्रकारानंतर सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी या टोळीचा छडा लावण्यासाठी ठिकठिकाणी पथके पाठविली. दरम्यान, शुक्रवारी रात्री हे तिघे पुन्हा बोरगाव गावच्या हद्दीत येणार असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. तिघेही दुचाकीवरून येत असताना पोलिसांनी एकावर झडप घातली मात्र, दोघेजण पळून गेले. पकडलेल्या अनिकेत जाधव याच्याकडून अन्य दोघांची माहिती पोलिसांनी घेतली. त्यानंतर संबंधित दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघेही अल्पवयीन असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या टोळीने यापूर्वी महामार्गावर आणखी कोठे, दरोडा टाकला आहे का, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, विजय साळुंखे, किरण निकम, राहुल भोये यांनी या कारवाईत भाग घेतला.