Kolhapur: पिस्तुलचा धाक दाखवून सराफाच्या घरात लूटमार, खुनातील आरोपीसह तिघांना अटक
By उद्धव गोडसे | Published: April 11, 2024 04:02 PM2024-04-11T16:02:08+5:302024-04-11T16:02:08+5:30
रोख रक्कमेसह चांदीचे दागिने लंपास
कोल्हापूर : पिस्तूल आणि गुप्तीचा धाक दाखवून तिघांनी मंगळवार पेठे येथील पुण्यपवित्र सोसायटीतील धर्मेद्र केसरीमल ओसवाल यांच्या फ्लॅटमध्ये घुसून लूटमार केली. हा प्रकार बुधवारी (दि. १०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. संशयितांनी रोख रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास केले. ओसवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास तिन्ही संशयितांना अटक केली.
महादेव उर्फ हणमंत मसगोंडा कुलगुटगी (वय ४७, रा. पाचगाव, ता. करवीर), युनूस हसनसाब मुलतानी (वय २८, रा. शिंदेनगर, निपाणी), धैर्यशील संभाजी सुतार (वय २५, रा. परिते, ता. करवीर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील महादेव हा २०१३ साली पाचगाव येथे झालेल्या एका खुनाची संशयीत आरोपी असून सध्या तो पॅरोलवर बाहेर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चांदीचे व्यापारी धर्मेद्र केसरीमल ओसवाल हे मंगळवार पेठेतील पुण्यपवित्र सोसायटीत फ्लॅट नंबर ४०२ मध्ये राहतात. बुधवारी रात्री नऊ वाजता ते त्यांची पत्नी आणि दुकानातील कामगार घरात होते. यावेळी संशयीत महादेव कलगुटकी व त्याचे दोघे साथीदार हातात गावठी बनावटीचे पिस्तुल, गुप्ती घेऊन घरात घुसले. त्यांनी ओसवाल व त्यांच्या कामगाराला मारहाण केली.
त्यानंतर ओसवाल यांच्या अंगावर पिस्तुल रोखले, त्यांच्या पत्नील गुप्तीचा धाक दाखवत ओसवाल यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच देव्हाऱ्यातील २० ग्रॅम चांदीचे निरंजन असा चार हजार रुपयांचा मुदद्देमाल घेऊन पलायन केले.
ओसवाल यांनी तातडीने जुना राजवाडा पोलीसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ओसवाल यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महादेव कलगुटकी याच्यासह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मुदद्देमाल व पिस्तुल,गुप्ती जप्त केली.