Maharashtra Election 2019 : स्वाभिमानी शेतकरीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे भाजपमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 02:55 PM2019-10-11T14:55:48+5:302019-10-11T15:32:42+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर संस्थापक जिल्हाध्यक्ष आणि राजू शेट्टी यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या भगवान काटे यांनीही अखेर भाजपची वाट धरली. चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात हा प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा संगीता खाडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर संस्थापक जिल्हाध्यक्ष आणि राजू शेट्टी यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या भगवान काटे यांनीही अखेर भाजपची वाट धरली. चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात हा प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा संगीता खाडे, काँग्रेसचे दौलत देसाई यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
कोल्हापूरात शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या महायुती मेळाव्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना २00२ मध्ये झाली. त्यावेळीपासून कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष असणारे भगवान काटे यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडली आहे.
यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पाठोपाठ स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशअध्यक्ष रवीकांत तुपकर यांनीही पक्ष सोडून कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला होता. भाजपच्या मंत्रिमंडळात रयतचे सदाभाउ खोत मंत्री आहेत.
भगवान काटे गेल्या काही वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी पक्षात कार्यरत होते आणि गेली दहा वर्षे त्यांनी राजू शेट्टी यांच्यासोबत जिल्ह्यात 'स्वाभिमानी'ची बांधणी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातील कारखानदारांविरोधात रस्त्यांवर लढा दिला. बारामती, इंदापूर, पंढरपूर येथील आंदोलनातही त्यांनी पुढाकार घेतला होता.
चंद्रकांत पाटील यांनी काटे यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, काँग्रेसचे दौलत देसाई यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होते.