‘स्वीकृत’सह समिती सदस्य निवडीला ‘खो’
By admin | Published: December 1, 2015 12:03 AM2015-12-01T00:03:55+5:302015-12-01T00:15:17+5:30
महापालिका : आचारसंहितेमुळे विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले
कोल्हापूर : महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य तसेच स्थायी, परिवहन, शिक्षण व महिला बालकल्याण समितीवरील सदस्य निवडी विधानसभा निवडणूक आचारसंहितेत अडकल्या आहेत. महानगरपालिका निवडणुका होऊन एक महिना झाला तरी या समित्या अस्तित्वात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्याचा महानगरपालिकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. या सदस्य निवडी घ्याव्यात का, याबाबत नगरसचिव कार्यालयाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ नोव्हेंबरला पार पडली. त्यानंतर नवीन सभागृह १५ नोव्हेंबरला अस्तित्वात आले. नवीन सभागृहात महापौर-उपमहापौर निवडी झाल्या. महानगरपालिकेचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण मंडळ समिती तसेच महिला व बालकल्याण समिती अस्तित्वात येणे आवश्यक आहे. नगरसचिव विभागाने या समित्यांवरील सदस्य निवडीसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने सभा घेण्याची तयारी केली होती. तोपर्यंत विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली असताना अशी सभा घेता येते का, हा वादाचा प्रश्न तयार झाला. शेवटी मनपा नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांनी याबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र त्यांनी पाठविले आहे. मात्र, अद्याप त्याचे उत्तर आलेले नाही. त्यामुळे विविध समित्यांच्या सदस्य निवडी तसेच स्वीकृत सदस्य निवडीचा कार्यक्रम अनिश्चित झाला आहे. निवडणूक आचारसंहितेचा परिणाम म्हणून सदस्य निवडींना ‘खो’ बसला असल्याने या अनुषंगाने होणाऱ्या इच्छुकांच्या हालचाली थंड पडल्या आहेत. कोणतीच चर्चा अथवा हालचाली नसल्याने समित्यांच्या इच्छुकांनी आपल्या ‘तलवारी म्यान’ केल्या आहेत. (प्रतिनिधी)
कामकाजावर मर्यादा
महानगरपालिकेच्या विविध समित्यांचे कामकाज नियमित सुरू न झाल्यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत. स्थायी समिती सभेत प्रत्येक आठ दिवसांनी आर्थिक धोरणांशी संबंधित निर्णय घेतले जातात; पण ही समितीच अस्तित्वात न आल्याने समितीच्या कामकाजावर मर्यादा आल्या आहेत.