जिल्हा परिषदेचे साडेबत्तीस कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:29+5:302021-07-29T04:25:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे ३२ कोटी ३७ ...

Loss of Zilla Parishad of Rs | जिल्हा परिषदेचे साडेबत्तीस कोटींचे नुकसान

जिल्हा परिषदेचे साडेबत्तीस कोटींचे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे ३२ कोटी ३७ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही काही ठिकाणचे पाणी पूर्ण ओसरले नसल्याने तेथील इमारतींचे किती नुकसान झाले, हे निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यातील प्रचंड पावसामुळे जिल्ह्याला महापुराचा फटका बसला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यातील घालवाड आणि नृसिंहवाडी प्राथमिक आराेग्य केंद्रांचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे. अरळगुंडी (ता. गडहिंग्लज), असळज (ता. गगनबावडा), उपकेंद्र पिपळे, केखले (ता. पन्हाळा) आणि आवळी बु. (ता. राधानगरी) या आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे.

महापुराचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या रस्त्यांना बसला आहे. इतर जिल्हा आणि ग्रामीण मार्ग अशा ७० रस्त्यांचे नुकसान झाले असून, याच्या दुरूस्तीसाठी १० कोटी रूपयांची गरज भासणार आहे. तर जिल्हा परिषदेकडील आणखी ३६ रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यासाठी ८ कोटी ६० लाख रूपयांची गरज भासणार आहे. जिल्ह्यातील १०४ शाळा आणि प्रशासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. याठिकाणी ७१ शाळांना आणि पाच प्रशासकीय इमारतींना महापुराचा फटका बसला आहे.

चौकट

सात ठिकाणी कोसळली दरड

राधानगरी तालुक्यातील पनोरी फेजिवडे, बाजरीचा धनगरवाडा, दुर्गमनवाड ते मिसाळवाडी रस्त्यावर दरड कोसळली आहे. तसेच पन्हाळा तालुक्यात बुधवार पेठ ते सुपात्रे रस्ता, म्हाळुंगे मसाई देवालय रस्ता, बोरपाडळे ते भाडळे रस्ता खचला आहे. गगनबावडा तालुक्यातील म्हासुर्ली, बावेलीपासून पुढे मिळणाऱ्या रस्त्यावर तर शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण पाल सावर्डी ते इजोली आणि शाहूवाडी ते येळवडी रस्त्यावर दरड कोसळली आहे.

चौकट

अ.न. विभाग तपशील संख्या अंदाजे नुकसान

१ ग्रामीण पाणी पुरवठा पा. पु, योजना ४८७ ९ कोटी ८० लाख

२ बांधकाम रस्ते ७० १० कोटी

इमारती १०४ १ कोटी ६७ लाख

३ मुख्यमंत्री/प्रधानमंत्री सडक रस्ते ३६ ८ कोटी ६० लाख

४ शिक्षण शाळा ९८ १ कोटी ९६ लाख

५ अंगणवाडी इमारती १२ ९ लाख

६ आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र,/उपकेंद्र ५ १० लाख ६५ हजार

७ पशुसंवर्धन पशुधन ६३ १५ लाख १३ हजार

एकूण ३२ कोटी ३७ लाख

चौकट

संपर्क तुटलेली गावे ४११

स्थलांतरित कुटुंब संख्या ३४ हजार २८६

स्थलांतरित लोकसंख्या १ लाख ५० हजार ६५७

नातेवाईकांकडे स्थलांतरित १ लाख २६ हजार ४५५

शासकीय निवारागृहे २९९

निवारागृहात स्थलांतरित १ लाख ६३ हजार ३९९

कोविडबाधित पूरग्रस्त निवारागृहे १९

दाखल कोविडबाधित पूरग्रस्त १२१

स्थलांतरित जनावरे ६१ हजार ७२०

बंद पडलेल्या पाणी योजना ४८७

चौकट

शेतकऱ्यांच्या दक्षतेमुळे वाचले पशुधन

महापुराचा अंदाज आल्यानंतर यंदा शेतकरी शांत बसले नाहीत. त्यांनी सुरक्षित ठिकाणी पशुधन नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर पशुधनाला महापुराचा फटका बसला नाही. जिल्ह्यातील ६० हजार ७९५ जनावरांना पशुपालकांनी महापुराआधीच सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तर शिरोळ तालुक्यातील तीन आणि करवीर तालुक्यातील दोन अशा पाच छावण्यांमध्ये ९२५ पशुधन स्थलांतरित करण्यात आले.

कोट

राहुल पाटील यांचा फोटो वापरावा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी महापुराच्या बैठकांमध्ये चर्चा केली आहे. कोरोनामुळे एकीकडे जिल्हा परिषदेवरील कामाचा ताण वाढला आहे. अशातच महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत शासनाकडून तातडीने निधी मिळवून देण्याची विनंती केली आहे. प्राधान्याने कराव्या लागणाऱ्या कामांची यादी तयार करण्यास सांगितले आहे.

- राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर

कोट

संजयसिंह चव्हाण यांचा फोटो वापरावा

नुकसानाचा हा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही काही गावांमधील पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही. यामुळे काही ठिकाणी जाता आलेले नाही. त्यामुळे आणखी काही दिवसात नेमके किती नुकसान झाले, हे निश्चित होईल. प्रशासकीय सूचनांप्रमाणे याचे अहवाल तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार निधीची मागणी केली जाईल.

- संजयसिंह चव्हाण

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: Loss of Zilla Parishad of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.