करवीर क्रीडानगरीत ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 02:51 PM2019-01-06T14:51:04+5:302019-01-06T15:49:34+5:30
गेले काही महिने ज्याची उत्सुकता लागून राहिली होती, त्या ‘विन्टोजीनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन २’ला राज्यातील तसेच राज्याबाहेरील धावपटूंनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे, जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या करवीर क्रीडानगरीत गर्दीसह शिस्तबद्धतेचा तसेच भव्यतेचा एक नवा मानदंड प्रस्थापित झाला.
कोल्हापूर : गेले काही महिने ज्याची उत्सुकता लागून राहिली होती, त्या ‘विन्टोजीनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन २’ला राज्यातील तसेच राज्याबाहेरील धावपटूंनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे, जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या करवीर क्रीडानगरीत गर्दीसह शिस्तबद्धतेचा तसेच भव्यतेचा एक नवा मानदंड प्रस्थापित झाला.
स्पर्धेतील आबालवृद्धांचा सहभाग, धावपटूंना प्रोत्साहन देण्याकरिता उसळलेली गर्दी, आतषबाजी, फुलांची उधळण, स्पर्धेच्या मार्गावर विविध वाद्यांनी धावपटूंचे झालेले स्वागत अशा जल्लोषी वातावरणात रविवारी पार पडलेल्या महामॅरेथॉन स्पर्धेने ‘धावणे ही आरोग्याची गुरुकिल्ली’ असल्याचा संदेश देतानाच समाजमनाच्या एकतेचा व बंधुभावाचा धागासुद्धा गुंफला.
‘लोकमत’ची कोणतीही स्पर्धा म्हटले की भव्यदिव्यपणा, वेगळेपणा, शिस्तबद्धता, नेटके संयोजन आणि खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग असे जणू समीकरण झाले आहे. त्याची प्रचिती करवीरकरांना रविवारी पुन्हा एकदा आली. गेल्या काही महिन्यांपासून ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन- २’ची तयारी सुरू होती.
माणिकचंद आॅक्सीरिच तसेच ट्रेडनेट वेल्थ सहप्रायोजक असलेल्या या स्पर्धेतील सहभागाची नोंदणी सुरू झाल्यापासून तर या स्पर्धेबाबत कमालीची उत्कंठा लागून राहिली होती. स्पर्धेतील सहभाग घेण्याबाबत झालेली चढाओढ पाहून एक विशिष्ट मर्यादेवर संयोजकांना नोंदणी बंद करावी लागली. त्यामुळे ज्यांना सहभागी होता आले नाही, त्यांनी निराश न होता सहभागी धावपटूंना प्रोत्साहन देण्याचा मोठेपणा दाखविला आणि स्पर्धेवरील आपले प्रेमही व्यक्त केले.
रविवारी सकाळी सव्वासहा वाजता प्रत्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार होती. मात्र पोलीस कवायत मैदानावर पहाटे साडेचार वाजल्यापासून धावपटू तसेच त्यांच्या नातेवाइकांनी गर्दी करायला सुरुवात केली. पहाटेच्या बोचऱ्या थंडीत शहरातील अनेक रस्त्यांवरून स्पर्धक पोलीस मैदानाकडे कूच करताना दिसत होते.
https://www.facebook.com/lokmat/videos/240959866619104/
अनेक स्पर्धकांनी गटागटाने तर काहींनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्र-मैत्रिणींसोबत सहभाग होऊन महामॅरेथॉनचा आनंद लुटला. विशेषत: महिला आणि शालेय मुलांचा कमालीचा उत्साह दिसून आला. स्पर्धेतील सहभागी आबालवृद्ध आपले वय, हुद्दा, प्रतिष्ठा सारे काही विसरून महामॅरेथॉनमध्ये धावत होते. आरोग्याच्या जनजागृतीबरोबरच एकता, बंधुभाव, खेळाप्रती असलेली आवड धावपटूंनी सिद्ध केली. अनेक वयोवृद्ध धावपटूंनी तर ‘अभी तो मैं जवॉँ हूॅँ’ हे दाखवून दिले. स्पर्धेने समाजमन जोडण्याचे काम केले.
अखेर सकाळी सहा वाजताची वेळ होताच स्पर्धकांसह उपस्थितांच्या नजरा डिजिटल बोर्डावरील घड्याळावर खिळून राहिल्या. घड्याळाचा काटा पुढे सरकत जाईल तसे निवेदिकेने पाच, चार, तीन, दोन, एक आणि ... म्हणेपर्यंत धावपटूंनी स्टार्टिंग पॉइंट ओलांडून धाव घेतली. सकाळी सव्वासहा वाजल्यापासून पुढे प्रत्येक पंधरा मिनिटांच्या अंतराने विविध गटांतील स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ‘फ्लॅग आॅफ’ करून सोडण्यात आले. सर्वप्रथम २१ किलोमीटर पुरुष व महिला स्पर्धकांना फ्लॅग आॅफ करून, तर त्यानंतर १० किलोमीटर, पाच किलोमीटर व तीन किलोमिटर अशा अंतराची मॅरेथॉन सोडताच स्पर्धकांनी लक्ष्याच्या दिशेने धाव घेतली.
मुख्य स्पर्धेला सुरुवात होताच आतषबाजी, धावपटूंवर होणारी फुलांची उधळण, हलगी-घुमक्याचा कडकडाट, तुतारीची ललकारी, झांजपथकाच्या ठेक्याने धावपटूंना प्रोत्साहित करण्यात आले. पुढे स्पर्धेच्या मार्गावर कोल्हापूर पोलीस तसेच अल्फान्सो स्कूल वाद्यवृंदाच्या लयबद्ध सुरांनी स्वागत केले. दत्तगुरू प्रासादिक भजनी मंडळाने प्रसन्न वातावरणात भक्तिगीते सादर केली. पोलीस मुख्यालयासमोर मर्दानी खेळांची व तलवारबाजीची साहसी प्रात्यक्षिके सादर झाली.
करवीरकरांनी केलेल्या गर्दीने तसेच गीत-संगीताने झालेले स्वागत पाहून धावपटूंचे मनोधैर्य व उत्साह अधिक द्विगुणित झाला. सुमारे तीन तासांहून अधिक काळ रंगलेला महामॅरेथॉनचा थरार अनुभवताना एका भव्यदिव्य आणि शिस्तबद्ध स्पर्धेचे मानकरी झाल्याचा साक्षात्कारही झाला.
संभाजीराजे छत्रपतींना धावण्याचा मोह
पोलीस कवायत मैदानावरील बोचऱ्या थंडीतील सळसळता उत्साह, आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग, गर्दीचा माहौल पाहून फ्लॅग आॅफ करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आलेले खासदार संभाजीराजे यांनाही या स्पर्धेत धावण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी ‘लोकमत’कडे किमान पाच किलोमीटर स्पर्धेत धावण्याची विनंती केली. त्यांना बीब देण्यात आले. त्यांनी तत्काळ मैदानावर वॉर्मअपदेखील केला. त्यांनी स्पर्धेतील अंतर सहजपणे पूर्ण करीत वाहवा मिळविली.