‘विवेक’च्या शिक्षणासाठी सरसावले मदतीचे अनेक हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:37 PM2019-07-27T13:37:55+5:302019-07-27T13:39:37+5:30
आई-वडील नसलेल्या कौलव (ता. राधानगरी) येथील विवेक विजय हुजरे याला उच्च शिक्षणासाठी मदत करणारे अनेक हात शुक्रवारी सरसावले आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विवेक याचे शैक्षणिक प्रवेश शुल्क भरण्यासाठी दानशूर संस्था, व्यक्तींनी आर्थिक मदत जाहीर केली.
कोल्हापूर : आई-वडील नसलेल्या कौलव (ता. राधानगरी) येथील विवेक विजय हुजरे याला उच्च शिक्षणासाठी मदत करणारे अनेक हात शुक्रवारी सरसावले आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विवेक याचे शैक्षणिक प्रवेश शुल्क भरण्यासाठी दानशूर संस्था, व्यक्तींनी आर्थिक मदत जाहीर केली.
प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत बारावी आणि सीईटीमध्ये चांगल्या गुणांची कमाई करीत विवेक उत्तीर्ण झाला आहे. बी. टेक. एन्व्हायर्न्मेंटल अभ्यासक्रम पूर्ण करून जिल्हाधिकारी होण्याचे त्याचे ध्येय आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे. दरवर्षीचे शैक्षणिक शुल्क ६० हजार रुपये आहे. पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेण्याकरिता त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याला आर्थिक मदतीची गरज असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या अंकात शुक्रवारी प्रसिद्ध झाले.
‘आई-वडील नसलेल्या विवेकला उच्च शिक्षणासाठी हवे बळ’ हे वृत्त विविध व्हॉट्स अॅप ग्रुपवर दिवसभर फिरले. त्यावर विविध दानशूर संस्था, व्यक्तींनी विवेकला शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याची तयारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयासह शिरोली, इचलकरंजी, पेठवडगाव, आदी परिसरांतील ‘लोकमत’च्या वार्ताहर आणि विवेक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून दाखविली. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील वुई केअर ग्रुपने भरघोस मदत देणार असल्याचे सांगितले.
ट्रेंडी व्हीलचे मालक उद्योजक उदय लोखंडे यांनी १० हजार, शिरोली ग्रामपंचायतीचे सदस्य व उद्योजक अविनाश कोळी यांनी पाच हजार, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील यांनी पाच हजार, उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी तीन हजार, उद्योजक आणि ‘रोटरी’चे गव्हर्नर संग्राम पाटील यांनी पाच हजार रुपयांची, तर दुनियादारी इचलकरंजी आणि डीएमके टेक्स्टाईल डिप्लोमा या ग्रुपने १५ हजारांची मदत जाहीर केली आहे.
शिवाजी विद्यापीठातील कर्मचारी आनंद खामकर यांनी दोन हजार रुपये, तर सिद्धेश घुणकीकर यांनी एक हजार रुपये विवेक याच्या बँक खात्यावर जमा केले. या दानशूर संस्था, व्यक्तींच्या मदतीने त्याच्या पहिल्या वर्षाच्या शुल्काची पूर्तता होईल. मात्र, त्याला पुढील तीन वर्षांच्या प्रवेश शुल्कासाठी आणखी मदतीची गरज आहे.