जोतिबा डोंगरावर लोटला भक्तिसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:28 AM2018-10-15T00:28:02+5:302018-10-15T00:28:06+5:30

जोतिबा : जोतिबा नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला रविवारी भाविकांची अलोट गर्दी झाली. जोतिबाचा उद्या, मंगळवारी जागर होणार आहे. रविवारी नवरात्रौत्सवाच्या ...

Lotta Bhaktisagar on Jyotiba mountain | जोतिबा डोंगरावर लोटला भक्तिसागर

जोतिबा डोंगरावर लोटला भक्तिसागर

googlenewsNext

जोतिबा : जोतिबा नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला रविवारी भाविकांची अलोट गर्दी झाली. जोतिबाचा उद्या, मंगळवारी जागर होणार आहे.
रविवारी नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला जोतिबाची पाच कमळपुष्पांमध्ये महापूजा बांधली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली. मंदिरासभोवती चार-पाच पदरी दर्शनरांगा लागल्या होत्या. दुपारी बारानंतर दर्शनरांगा मंदिराबाहेरील ठाकरे मिटके गल्लीपर्यंत पोहोचल्या. दर्शनरांग व्यवस्थेसाठी देवस्थान, पोलीस, पुजारी समितीचे कर्मचारी तैनात होते. तेल अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
जोतिबा डोंगरावर स्थापित नवदुर्गाचे दर्शन स्थानिक नवरात्र उपासकांनी पायी चालत घेतले. देवाला फलाहार, नैवेद्य नवरात्र उपासकांनी दाखविला. सायंकाळी सात वाजता जोतिबा पुजारी समिती यांच्यावतीने चंचल देशपांडे कोल्हापूर यांचा भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. रात्री डवरी गीतांचा कार्यक्रम झाला. रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी जोतिबाचा डोंगर चढत होते.
नवरात्रौत्सवाच्या सप्तमीला जोतिबा देवाचा जागर असतो. मंगळवारी जागरानिमित्त श्री जोतिबा देवाची चार मुक्तीचे प्रतीक दाखविणाऱ्या चौफुल्यामध्ये महापूजा बांधली जाते. पूजेपुढे उन्मेष नावाचा अश्व (घोडा) अर्पण केला जातो. मंदिराच्या दरवाजावर सीताफळ, कवंडाळ, बेल, फुलांचे तोरण बांधले जाते. जागरादिवशी भाविक मोठ्या प्रमाणात ऊस, कडकणी अर्पण करतात. फलाहाराचा पाच ताटांचा नैवेद्य वाजत-गाजत यमाई मंदिराकडे जातो. उंट, घोडे, वाजंत्री, देव सेवकाच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघेल. मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. मंदिरात भजनाचा कार्यकम होतो.

Web Title: Lotta Bhaktisagar on Jyotiba mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.