महाराष्ट्र केसरी ‘सुंदर’च्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर
By Admin | Published: March 10, 2017 10:49 PM2017-03-10T22:49:36+5:302017-03-10T22:49:36+5:30
एका झंझावाताचा अंत; शंभरहून अधिक पहिल्या क्रमाकांची बक्षिसे
खटाव : तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलेल्या खटावमधील विजय गणपत भूप यांचा शर्यतीचा बैल सुंदर याच्या अकस्मात मृत्यूच्या बातमीने खटावमध्ये क्षणभर शांतता पसरली. आणि क्षणार्धात भूप यांच्या घरासमोर ग्रामस्थांनी सुंदरच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
भूप यांच्या घराजवळच असलेल्या गोठ्यात सुंदर रोज उभा असायचा; परंतु दि. ८ पासून सुंदरच्या बदललेल्या हालचालीमुळे भूप यांचे त्याच्याकडे लक्ष गेले असता तो उभा राहू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना त्वरित घरी आणून त्याची तपासणी केली. औषधोपचार केले; परंतु काहीच ईलाज न चालल्याने अचानक सुंदरने क्षणार्धात अखेरचा श्वास घेतला.
सुंदरचे वय सहा वर्षे होते. अवघ्या दोन वर्षांचा असताना त्याला भुपांनी घरी आणले. चार वर्षांपासून आतापर्यंत सुंदरने शंभरहून अधिक पहिल्या क्रमांकाची बक्षिसे मिळवत शर्यतीचा राजा, बरोबरच ‘महाराष्ट्र केसरी’ नावाने त्याला संबोधला जायचे. कोठेही बैलांच्या शर्यती असतील तर त्याच्या तोडीस कोणताच बैल टिकत नव्हता. एखाद्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे सुसाट पळणाऱ्या या बैलाचा दबदबा असल्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या बैलाच्या खरेदीकरिता मागणी होत होती. दुष्काळी परिस्थितीत याच सुंदर बैलाची १३ लाखांला मागणी केली होती. परंतु भूप यांनी सुंदरला न विकण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे सुंदर त्यांच्या गोठ्यात उभा होता.
दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळातही गोठ्याची शान असलेल्या सुंदर बरोबरच त्याचा साथीदार असलेला दुसरा बैल, त्याच बरोबर लहान दोन खोंड अशा एकूण पाच बैलांना छावणीत न ठेवता मोठ्या कष्टाने त्यांचे पालनपोषण केले. त्याही परिस्थितीत त्यांना लागणाऱ्या खाद्याची व्यवस्था करून त्याची घरीच सोय केली होती. गेल्या तीन वर्षांपासून मात्र बैलगाड्यांच्या शर्यतीवर शासनाने बंदी आणली. या शर्यती आज सुरू होतील, उद्या सुरू होतील, या आशेवर जगणाऱ्या या शेतकऱ्याला अखेर आपला बैल गमवावा लागला. ज्या गोठ्यात सुंदरची पंचारतीने प्रत्येकवेळी ओवाळणी व्हायची, गुलालाची उधळण व्हायची त्याच गोठ्यातून त्याची निघालेली अंतिम यात्रा पाहताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. (वार्ताहर)
गेल्या तीन वर्षांपासून या शर्यती बंद झाल्यामुळे आर्थिक तंगी जरी असली तरी कितीही ओढाताण झाली तरी बैलांच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. एकवेळ कुटुंबाकडे कमी; पण या बैलांच्या देखभालीत कुठेही हलगर्जीपणा होऊ दिला नाही. या तीन वर्षांत शर्यत बंदी असली तरी बिनजोड शर्यती लावून त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवण्यात सुंदरने दिलेली साथ कधीच विसरू शकणार नाही.
- विजय भूप, बैल मालक
महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलेल्या सुंदर बैलाचा अंत.