प्रेम प्रकरणातून युवतीने टाकली पंचगंगेत उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 02:30 PM2020-11-05T14:30:35+5:302020-11-05T14:50:14+5:30
Lovematter, Suicide, river, kolhapurnews, police प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय प्रेयसीने शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी टाकली, पाठोपाठ प्रियकरानेही नदीत उडी मारून प्रेयसीला नागरिकांच्या मदतीने वाचवले. संबंधित युवती गोकुळ शिरगाव येथील तर युवक हा पुनाळ (ता. पन्हाळा) येथील आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.
कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय प्रेयसीने शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी टाकली, पाठोपाठ प्रियकरानेही नदीत उडी मारून प्रेयसीला नागरिकांच्या मदतीने वाचवले. संबंधित युवती गोकुळ शिरगाव येथील तर युवक हा पुनाळ (ता. पन्हाळा) येथील आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की संबंधित युवक हा गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये खासगी कंपनीत नोकरीस आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हे प्रेमीयुगल पन्हाळा मार्गावरून दुचाकीवरून येऊन शिवाजी पुलावर थांबले. या दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे शाब्दिक वादावादी झाली. या वादातूनच संबंधित युवतीने आपल्याकडील सॅक दुचाकीला अडकून रागाच्या भरात थेट पुलावरून पंचगंगा नदीच्या पाण्यात उडी टाकली.
भांबावलेल्या ३० वर्षीय प्रियकरानेही पाठोपाठ पाण्यात उडी टाकली. आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीकडे धाव घेतली. यावेळी काही काळ गोंधळ उडाला.
यावेळी शिवाजी चौकात बंदोबस्तासाठी असणारे पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप निळपणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिवाची पर्वा न करता त्यांनी वडणगे बाजूने रस्त्यावरून नदीकडे धाव घेतली. त्याचवेळी ते तोल जाऊन पडले, तीव्र घसरतीला त्याना तीन-चार वेळा कोलांटी खाव्या लागल्या. त्यातूनही ते सावरून नदीपात्रानजीक पोहचले.
दरम्यान, प्रियकरानेही आपल्या प्रेयसीला पाण्यातून काठावर आणले. पोलीस निरीक्षक संदीप निळपणकर यांनी त्या दोघांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
दरम्यान, मदतीसाठी धावलेले पोलीस कॉन्स्टेबल निळपणकर हे जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, करवीर पोलीस ठाण्यात प्रेमीयुगुलांच्या चौकशीचे काम सुरू होते. त्यांच्या नातेवाइकांना बोलवून घेण्यात आले आहे.