फेसबुकवरील प्रेमाने सुखी संसाराला लाथाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:48+5:302021-06-22T04:17:48+5:30
राशिवडे : दोन चिमुकल्यांना घेऊन रिमझिम पावसात विठ्ठल मंदिराशेजारी ‘ती’ दुपारी तीन वाजेपासून ‘त्या’ युवकाची वाट पाहत होती. अनोळखी ...
राशिवडे : दोन चिमुकल्यांना घेऊन रिमझिम पावसात विठ्ठल मंदिराशेजारी ‘ती’ दुपारी तीन वाजेपासून ‘त्या’ युवकाची वाट पाहत होती. अनोळखी महिला व मुलांना पाहून काही ग्रामस्थांनी तिची चौकशी केली. मला न्यायला येणार आहेत एवढेच उत्तर ती देत होती. भुकेने व्याकूळ झालेली चिमुकली मुले आणि घालमेल झालेली ती महिला पाहून सर्वच अस्वस्थ होत होते. चार दिवसांपासून प्रियकरासोबत ती महिला फिरत असल्याचे सत्य समोर येताच अनेकांनी त्याला व तिला लाखोली वाहिली.
सोशल मीडिया हे साधन धावपळीच्या जीवनात सोयीचे असले तरी अतिवापरामुळे हेच साधन गैरसोयीचे बनले आहे. या माध्यमातून झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तिचे वय २४, लग्न झालेले आणि त्याचे वय वीस अविवाहित तरुण त्यांची मने जुळली आणि सुखाने चाललेला संसार उद्ध्वस्त झाला. ही घटना राधानगरी तालुक्यात घडली असली तरी ते प्रेमीयुगुल हातकणंगले तालुक्यातील. राधानगरी तालुक्यातील एका मोठ्या बाजारपेठेच्या गावामध्ये दुपारी तीनच्या सुमारास दोन वर्षे व आठ ते दहा महिने वयाच्या दोन लहान मुलांना घेऊन एक चोवीसवर्षीय विवाहिता विठ्ठल मंदिराजवळ बसली होती. बराच वेळ कोणाची तरी वाट पाहत बसलेल्या अनोळखी महिलेची ग्रामस्थांनी विचारपूस केली; पण ओढ्यावर पाणी आले असून, धामोड पैकी मान असलेल्या वाडीतील नातेवाईक मला न्यायला येत आहेत, एवढेच सांगत होती.
दरम्यान, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्या महिलेच्या सासरची मंडळी शोधत विठ्ठल मंदिराजवळ पोहोचली आणि सत्य समोर आले. आपल्या सुखी संसाराला लाथाडून ती महिला दोन चिमुकल्यांना घेऊन प्रियकरासोबत चार दिवसांपासून फिरत आहे. प्रियकराचा मित्र त्यांना आसरा देणार होता; पण त्यालाच त्या दोन लहान जिवांची दया आली आणि त्याने महिलेच्या घरच्यांना पत्ता दिला. बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर त्या महिलेसह नातेवाईक निघून गेले. पोलिसात या घटनेची नोंद झाली नाही.