रुग्णांसाठी खानविलकर कुटुंबातर्फे प्रेमाचा घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:25 AM2021-05-12T04:25:55+5:302021-05-12T04:25:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली की, रुग्णासह नातेवाईकदेखील हवालदिल होतात. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली की, रुग्णासह नातेवाईकदेखील हवालदिल होतात. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होतात, तर बाहेर कुटुंबियांची घालमेल सुरू असते. दोन घास पोटात ढकलावेत, तर लॉकडाऊनमुळे काही विकतदेखील मिळत नाही, अशा या कठीणप्रसंगी सीपीआरमधील रुग्ण व नातेवाईकांसाठी दिग्विजय खानविलकर फौंडेशनच्यावतीने जेवण पुरवले जात आहे.
माजी मंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांनी सीपीआर रुग्णालयाला नवसंजीवनी दिली. त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी खानविलकर यांच्यासह कुटुंबियांतर्फे नेहमीच जनतेसाठी मदतीचा हात दिला जातो. आता तर कोरोनासारख्या महामारीच्या काळात आभाळच फाटलंय, ठिगळ कुठं लावणार, अशी स्थिती झाली आहे. एकदा रुग्ण रुग्णालयात आला की, त्याचा नातेवाईकांशी संपर्क तुटतो, बाहेर नातेवाईकांच्या जिवाची घालमेल सुरू असते. रुग्णासह कुटुंबियांची या कठीण काळात जेवणाविना आबाळ होऊ नये, यासाठी खानविलकर कुटुंबियांच्यावतीने रोज सव्वाशेहून अधिक लोकांसाठी जेवणाची पाकिटे पुरवली जात आहेत. दिग्विजय खानविलकर फौंडेशनतर्फे गेल्या आठवड्याभरापासून हा उपक्रम सुरू आहे.
राजलक्ष्मी खानविलकर या स्वत: हे जेवण बनवतात. मुलगा विश्वविजय, सून सुमित्रा, नातवंडे विरविजय आणि सिद्धिविजय त्यांची मित्रमंडळी सगळे मिळून जेवणाचे पॅकिंग करतात आणि सकाळी सिपीआरच्या व्यवस्थापनाकडे ते सुपूर्द केले जातात. त्यांच्याकडून गरजेनुसार रुग्ण व नातेवाईकांना हे जेवण दिले जाते.
--
काय वाटप केले जाते..
भाजी, चपाती, आमटी, भात, केळी, अंडे असा हा पूरक आहार असतो. उपवासाचा दिवस असतो, त्यावेळी काही पाकिटांमध्ये खिचडी, फळे दिली जातात.
माझ्या सासूबाई होत्या, तेव्हापासून आम्हाला जनतेच्या सेवेचे बाळकडू मिळाले आहे. खानविलकर साहेब असताना आणि त्यांच्यानंतरही आम्ही हा वसा सोडलेला नाही. कुणाचे आई, वडील, भाऊ, पत्नी आता कोरोनामुळे ॲडमिट आहेत, कुटुंबीय हवालदिल झालेत, माणूस माणसाच्या जवळ येईनासा झाला आहे. अशा परिस्थितीत आमच्या माध्यमातून त्यांना काही प्रमाणात का असेना आधार देण्याचा प्रयत्न आहे.
राजलक्ष्मी खानविलकर
--
फाेटो नं ११०५२०२१-कोल-खानविलकर फौंडेशन
फोटो ओळ : कोल्हापुरातील दिग्विजय खानविलकर फौंडेशनतर्फे सीपीआरमधील रुग्ण व नातेवाईकांसाठी रोज सकाळी जेवणाची पाकिटे पुरवली जात आहेत.
---