स्वत:वर प्रेम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:29 AM2019-06-24T00:29:52+5:302019-06-24T00:29:57+5:30
इंद्रजित देशमुख आमच्या पारमार्थिक जीवनात दमन हा दैवी गुण जोपासत असताना आमच्या सतत लक्षात असायला हवं की, परमार्थात जगावर ...
इंद्रजित देशमुख
आमच्या पारमार्थिक जीवनात दमन हा दैवी गुण जोपासत असताना आमच्या सतत लक्षात असायला हवं की, परमार्थात जगावर प्रेम करावंच करावं; पण जगावर प्रेम करण्याअगोदर स्वत:वर प्रेम करावं, तरच आमची दृष्टी प्रेमभरीत होऊ शकते. ज्या दृष्टीत स्वत:बद्दल प्रेमभाव नाही, ती दृष्टी चराचरात पसरलेला एकसमान वैश्विक जोपासू शकत नाही. अगदी माऊलींच्याच शब्दांत सांगायचं झालं तर,
‘जयाचे ऐहिक धड नाही।
तयाचे परत्र पुससी कायी।’
अशी आमची अवस्था होऊ शकते. म्हणजे जे स्वत:वर प्रेम करू शकत नाहीत, ते जगावर प्रेम कसं बरं करणार. मुळात प्रेम हेसुद्धा एक दमनच आहे. एखादी व्यक्ती परिस्थिती आणि घटना यांना आहे तसं स्वीकारताना त्या व्यक्ती परिस्थिती आणि घटना याबद्दलचे सर्व बरे व वाईट असे सर्व पूर्वग्रह दुर्लक्षित करावे लागतात. काही वेळा ते आहेत तसे स्वीकारावे लागतात म्हणजेच हे एक दमनच आहे. आणि ते दमन महाराजांनी म्हटल्याप्रमाणे
नलगे सांडणे मांडणे। आगमानिगमाचे देखणे।।
असं सहज व सोपं आहे. या पद्धतीने जगताना आमच्या वाट्याला आलेली सगळी कर्तव्ये समरसून पूर्ण करत,
‘विधिते पाळीत। निषेधाते गाळीत।।’
असं जगता आलं पाहिजे. निव्वळ दार्शनिक त्यागाच्या अनुनयाने दमन कधीच साधणार नाही. त्यासाठी आमचं वागणं
‘कुलधर्म चाळी। विधिनिषेधाते पाळी।
ऐसी तुज सुखे सरळी। दिधली आहे।।’
असं असलं तर काहीच हरकत नाही. मात्र, त्या वागण्यातून निर्माण होणारा कर्तव्य अहंकार भाव आमच्या अंगी येता कामा नये किंवा तो अंगी येऊ न देण्याची खबरदारी घेणं म्हणजेच दमन होय. ज्यांना हे दमन साधता आलं नाही, त्यांचा पारमार्थिक प्रवास व्यवस्थित होत नाही, म्हणूनच या दमनाची जोपासना आम्हाला करावी लागेल.
वारकरी सांप्रदायातील जे संत झाले, त्या सर्वांनी आम्हाला याच दमनाची शिकवण दिलीय. आजच तुकोबाराय, तर उद्या ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. यातील लाखो वारकरी जीवनातील सर्व भोगांना अंगीकारत जीवन जगत असतात. तरीही या वारीत त्यांचं जीवनसंयोजन पाहिलं की त्यात प्रचंड दमन पहायला मिळेल. जीवनात जो जसा प्रसंग येईल तसं जगावं लागतं यांना. कधी क्रोध, कधी काम, लोभ या सर्वांना जीवनसाथी समजून जगताना कोणताच दार्शनिक भाव यांच्या जगण्यात नसतो. वारकऱ्यांच्या जीवनाचा विचार केल्यास ते कुणाच्याच अस्तित्वाचा त्याग करीत नसून, ते त्याग करतात त्या अस्तित्वामुळे होणाºया परिणामाचा. ‘ज्ञान गिळूनी गावा गोविंद गा।’ या वचनाशी बांधीलकी जोपासून जगताना ते वस्तूच्या अस्तित्वामुळे होणारा परिणाम अंगलट न येऊ देणं म्हणजे दमन.
एकदा एका हॉटेलमध्ये दोन मित्र गेलेले असतात. दोघांनाही मधुमेह असतो. त्यामुळे त्यांना अजिबात गोड खायला चालत नसते. मग ते मस्तपैकी तिखड पदार्थ खाऊ लागतात. हॉटेल खूप मोठं असल्या कारणाने तेथे खूप पदार्थ असतात. नाष्टा करत असताना दोघांतील एकजण अस्वस्थ झालेला असतो. दुसरा मित्र मात्र खूप शांत असतो; तो त्या मित्राला बारकाईने निरखत असतो. पहिला अस्वस्थ असणारा मित्र हॉटेलमधील गोड पदार्थ निव्वळ बघून अस्वस्थ होतो. तेथील गोड पदार्थ व त्यांचे गोड स्वाद यांच्या संपर्कामुळे तो आजारी पडतो. दुसरा मित्र सर्व पदार्थांच्या सान्निध्यात असूनही शांतपणे ताटातील पदार्थ खात असतो. सर्वच पदार्थांच्या संपर्कात असतानाही तो शांत असतो. याचे कारण त्याने सगळ्या भवतालच्या पदार्थांकडे दुर्लक्ष केलेले असते. त्यामुळेच तो शांत राहू शकतो. आम्ही दमन करताना वस्तूच्या अस्तित्वाचं करतो. अस्तित्वाच्या त्यागाने दमन साधू शकत नाही, तर अस्तित्वापेक्षा त्या अस्तित्वाच्या संपर्कामुळे होणाºया चुकीचा परिणाम टाळता आला पाहिजे. तसं पाहिलं तर अस्तित्वापेक्षा परिणाम कधीही महत्त्वाचा
असतो.
या दमनाचे संस्करण होताना जीवनात समोर आलेल्या सर्व घटकांचा प्रामाणिक अंगीकार व्हावा. या अंगीकारावेळी कशाचा धिक्कार नसावा व कुणाबद्दल घृणाही नसावी. एखाद्या गोष्टीचा ओढाताण करून केलेला त्यागही नसावा व वरून त्याग आणि आतून भोगलालसाही नसावी. स्वीकृतीपेक्षा स्वीकृतीचं चिंतन ही परिणामकारक असतं याच भान आपल्या अंतर्यामी सदैव ठेवून आम्ही जगावं एवढीच अपेक्षा.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)