फुलेवाडी रिंग रोडला कमी दाबाने पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:31+5:302021-07-02T04:16:31+5:30
फुलेवाडी : फुलेवाडी रिंग रोडवरील तब्बल ४० ते ५० कॉलनी, नगरांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. ...
फुलेवाडी : फुलेवाडी रिंग रोडवरील तब्बल ४० ते ५० कॉलनी, नगरांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही कॉलनींमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. रिंगरोडलगतच्या साने गुरुजी वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी परिसरात २४ तास मुबलक पाणी पुरवठा होतो. परंतु, रिंगरोडसाठी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत पाणी सोडले जाते, तेही कमी दाबाने किंवा येतच नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रिंगरोडवरील गजानन कॉलनी, संत सेना कॉलनी, सद्गुरू कॉलनी, शिवशक्ती नगर, प्रतिराज गार्डन, चंद्राई कॉलनी, ओम पार्क, महालक्ष्मी पार्कमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी अत्यंत कमी किंवा पाणीच येत नसल्याने अशाठिकाणी महापालिकेकडून टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
याबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, रिंगरोडवरील सहा इंची पाईपलाईनला तीन ते चार ठिकाणी जॉईंट करून संपूर्ण रिंगरोडला मुबलक पाणी पुरवठा करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याचे कनिष्ठ अभियंता प्रिया पाटील यांनी सांगितले. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास दोन दिवसात रास्ता रोको करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई यांनी दिला आहे.
चौकट : लिकेजीस कधी निघणार ?
सध्या रिंगरोडवर बाळासाहेब इंगवले नगर, लक्ष्मीनारायण कॉलनी ,बोंद्रे नगर चौक, अभियंता कॉलनी, ग्रामसेवक कॉलनी येथे पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती आहे. ही गळती कायमस्वरूपी निघाल्यास पाण्याचा अपव्यय थांबून पाणी पुरवठा मुबलक होण्यास मदत होणार आहे.
फोटो : ०१ फुलेवाडी पाणी पुरवठा
ओळ : शिवशक्ती नगर येथे टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. (छाया : सागर चरापले)