निष्ठावंत वाऱ्यावर, पैसेवाले खुर्चीवर
By admin | Published: October 12, 2015 12:41 AM2015-10-12T00:41:57+5:302015-10-12T00:53:43+5:30
कशाला हवी पक्षनिष्ठा...! : सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, आयाराम-गयारामांची चलती
तानाजी पोवार -- कोल्हापूर: ‘मी पाच वर्षे पक्षाशी एकनिष्ठ आहे, पण व्यक्तिकर्तृत्व?... ‘तो’ प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलतो, ‘दलबदलू’चा त्याच्यावर जाहीरपणे आरोप होतात, ज्याच्याकडे रग्गड पैसा, व्यक्तिकर्तृत्वही आहे... मग त्यालाच उमेदवारी. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशाच उमेदवारांच्या मागे पक्षाचे नेते अक्षरश: हात धुऊन उमेदवारी घेण्यासाठी मागे लागतात व त्यालाच उमेदवारी दिलीही जाते. त्यामुळे कशाला पाच वर्षे, दहा वर्षे पक्षनिष्ठेने काम करायचे?, असा सवाल डावललेल्या उमेदवारांतून उमटत आहेत. महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना पक्षनिष्ठेवर व्यक्तिकर्तृत्वाने मात केली आहे. सध्याच्या निवडणुकीत सर्वच पक्ष, आघाड्यांकडून पक्षनिष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारीला चक्क नेत्यांनीच ‘स्वत:च्या सोयी’साठी तिलांजली दिल्याचे स्पष्ट चित्र या निवडणुकीतून दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणांगणात प्रमुख चार आघाड्यांसह लहान-लहान अशा एकूण नऊ आघाड्यांनी एकमेकांविरोधात रणशिंग फुंकले आहे. या प्रमुख चार आघाड्यांमध्ये पहिल्या टप्प्यात विशेषत: भाजप-ताराराणी आघाडीकडे उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच होती. त्यानंतर जस-जशा पक्षाच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी याद्या जाहीर होतील तशी पक्षातील नाराजी चव्हाट्यावर येऊ लागली. दुसऱ्या यादीनंतर मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी थेट नेत्यांवरच चिखलफेक करण्यात धन्यता मानली तर काहींनी उमेदवारी डावलल्याने दुसऱ्या पक्ष-आघाड्यांकडे धाव घेतली; पण यामुळे खरे निष्ठावंत अडगळीतच राहिले.
पाच वर्षे पक्षासाठी आंदोलने करायची, नेत्यांच्या सेवा करायच्या, पक्षाचे सभासद वाढविण्यासाठी रस्त्यांवर फिरायचे, पक्षाचे झेंडे घेऊन अन्यायाविरोधात उन्हा-तान्हांत रस्त्यांवर आंदोलने करायची, अक्षरश: पक्षाच्या कार्यालयातील टेबलावरील धूळही झाडण्याची कामे हे पक्षाचे ‘निष्ठावंत कार्यकर्ते’ करताना दिसतात; पण पाच वर्षांनंतर निवडणुका आल्या की, त्याच उमेदवारांचा आर्थिक स्तर पाहिला जातो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फक्त पक्षनिष्ठा जोपासत कामे करायची आणि ज्याची आर्थिक ताकद जास्त त्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश करायचा अन् तिकीट मिळवायचे.
जुन्या कार्यकर्त्यांनी पुन्हा खळ-पोस्टर लावण्याचे काम करायचे, हीच का पक्षाची निष्ठा... नव्हे, नेते निष्ठा म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ज्याच्यामागे आर्थिक पाठबळ जास्त आहे. तो कोणत्याही पक्षात नसला तरी त्याला उमेदवारी ही मिळतेच मग पक्षाची निष्ठा कशाला हवी? असा प्रश्न आता निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. काही पक्षांत तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना चक्क नेत्यांनीच कट्ट्यावर बसविले आहे. पैशांनी गडगंज असणाऱ्या उमेदवाराला एका पक्षाने डावलले तर दुसरा पक्ष-आघाडी त्यांना उचलून उमेदवारी देतोच व त्या प्रभागातील ‘निष्ठावंत कार्यकर्ता’ हा नेत्याला परका वाटू लागतो. त्यामुळे त्या कार्यकर्त्याला हेच नेते पोरके करतात. हे चित्र या निवडणुकीतील या चारही प्रमुख पक्ष-आघाड्यांत उघडपणे दिसून येत आहे. दुसऱ्या पक्षाने उमेदवारी डावलली म्हणून ऐन निवडणुकीवेळी पक्षात आलेले निवडणुकीनंतर त्याच पक्षाशी कधीही एकनिष्ठ राहिलेले नाहीत. पुढील निवडणुकीत हे दुसऱ्याच पक्षाकडे दिसतात; पण त्याचे नेत्यांना काही सोयरसुतक नसते.
अशा उमेदवारांना ‘दल बदलू’ म्हणून आरोप केले तरीही त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. काही पक्षांनी तर दुसऱ्या पक्षांशी संधान बांधून काही नेत्यांनी निवडणुकीआधीच स्वत:च विकास साधल्याचीही उघड-उघड चर्चा होत आहे; पण या चर्चेचे या नेत्यांना सोयरसुतक नाही. त्यामुळे पक्षनिष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्याचा एकच प्रश्न आहे, कशाला हवी पक्षनिष्ठा!
मुलाखतींचा केवळ फार्सच
गुन्हेगार, मटका-दारूवाले, दोन नंबर व्यावसायिक अशा काळ्या यादीतील उमेदवारांना आमच्याकडे स्थान नाही, असे मोठ्या दिमाखात सांगणाऱ्या नेत्यांनीच अशा दोन नंबर व्यावसायिकांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना स्थान दिले आहे. काही पक्षाचे नेतेच चक्क दोन नंबर व्यावसायिक आहेत.
उमेदवारी देण्यापूर्वी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, पण सर्वच उमेदवारांना मुलाखतीद्वारे निवड केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नेत्यांनी पक्षनिष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांना चक्क फसविण्यासाठी अनेक ठिकाणी मुलाखतीचा फार्स केल्याचे चित्र या उमेदवारी यादीतून स्पष्ट झाले आहे.