जिल्हाध्यक्षपदावरून भाजपमध्ये निष्ठावंतांची उसळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:38 AM2020-12-13T04:38:43+5:302020-12-13T04:38:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हाध्यक्ष पदावरून भाजपमध्ये सध्या निष्ठावंत जास्तच आक्रमक झाले असून, त्यांचा कधीही स्फोट होण्याची शक्यता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हाध्यक्ष पदावरून भाजपमध्ये सध्या निष्ठावंत जास्तच आक्रमक झाले असून, त्यांचा कधीही स्फोट होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पक्ष वाढविण्याचे निमित्त करून बाहेरून पक्षात आलेल्या नेत्यांना संघटनेतील पदे देत असल्याबद्दल ही मुख्यत: नाराजी आहे. त्याला आमदार पाटील विरुद्ध माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यातील छुपा संघर्षाचीही किनार आहे.
सध्या समरजित घाटगे हे जिल्हाध्यक्ष आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांनी संघटनात्मक पातळीवर बांधणी करून काम सुरू केले आहे. देशातील शेतकरी कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करीत असताना घाटगे जिल्ह्यातील गावोगावी जाऊन या विधेयकापासून शेतकऱ्याला कसा फायदा होऊ शकतो याची माहिती देत प्रबोधन करीत आहेत. आमदार पाटील यांनीही त्यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले आहे. त्यांचे काम सुरू असताना तोपर्यंत अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे जिल्हाध्यक्षपदासाठी नाव पुढे आले आहे. आवाडे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटीगाठीही झाल्या आहेत. शुक्रवारी एका कार्यक्रमात आवाडे यांनी केंद्र सरकारच्या कामाचे कौतुक व राज्य सरकारवर टीका करून भाजप प्रेम दाखवून दिले आहे. त्यामुळे हाळवणकर गट अस्वस्थ आहे. जिल्ह्यातील भाजपमध्ये चंद्रकांत पाटील व हाळवणकर यांच्यात छुपा संघर्ष राहिला. त्यामुळेच शक्य असतानाही राज्यातील सत्तेत हाळवणकर यांना संधी मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीतही आवाडे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीस उभे करण्यात भाजपचीच खेळी असल्याची चर्चा होती. आवाडे विजयी झाले की त्यांना लगेच भाजपमध्ये घेतले जाईल अशी चर्चा ऐन निवडणुकीत होती. त्यामुळे त्यावेळी आमदार पाटील यांना धावतपळत येऊन सभा घेऊन आवाडे यांना पक्षात घेण्याचा प्रश्र्नच येत नाही असे सांगावे लागले. आता हाच मुद्दा नव्याने ऐरणीवर आला आहे. समरजित घाटगे काय किंवा आवाडे काय हे दोन्हीही मूळचे भाजपचे नाहीत असे निष्ठावंत गटाला वाटते. माजी खासदार धनंजय महाडिक लोकसभेला पराभूत झाल्यावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आले. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले. नंतर त्यात फेरबदल करण्यात आला; परंतु भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पदे वाटतात आणि पक्षासाठी आयुष्य खर्ची घातलेले लोक वळचणीला पडतात, असा मुख्य रोख आहे. या सगळ्या विरोधात जिल्हात संघटित विरोध एकवटू लागला आहे. काही दिवसांत पत्रकार परिषद घेऊन त्याविरोधात जाहीर भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.