सत्तेसाठी निष्ठा खुंटीवर
By admin | Published: April 26, 2015 12:49 AM2015-04-26T00:49:57+5:302015-04-26T00:49:57+5:30
सोयीचे राजकारण : सत्तेच्या वाटणीत कार्यकर्ते वाऱ्यावर
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षनिष्ठा व आपली तत्त्वे खुंटीला ठेवून सोयीचे राजकारण केले. बॅँकेत लागलेला डाग पुसण्यासाठी की केलेल्या कारभारावर पांघरूण घालण्यासाठी नेत्यांनी अशी मिटवामिटवीची खेळी केली. याबाबत संभ्रमावस्था असून, सत्तेच्या वाटणीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याच्या संतप्त भावना उमटू लागल्या आहेत.
सहा वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे बॅँकेवर प्रशासक आले. विनातारण कर्जवाटप, वारेमाप खर्च यामुळे बॅँक ११/१ सेक्शनमध्ये गेल्याने बॅँकेबरोबर सभासदांचे मोठे नुकसान झाले. लाभांश न मिळाल्याने संस्थांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासकांनी बॅँकेला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण अजूनही बॅँक पूर्णपणे बाहेर आलेली नाही. तोपर्यंत बॅँकेची निवडणूक लागली. ज्यांच्या कारभारामुळे बॅँक अडचणीत आली, तीच मंडळी पुन्हा सत्तेसाठी पुढे आले. आजपर्यंत नेत्यांनी आपल्या भोवतीच राजकारण केल्याने ते कार्यकर्त्यांना संधी देऊच शकत नाहीत. या मंडळींबद्दल कमालीची नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे. बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत संचालक मंडळ नकोच, असा ठराव सभासदांनी केला होता. अशा परिस्थितीत कोणत्या तोंडाने सभासदांसमोर मते मागायला जायचे? असा प्रश्न सत्तारूढ गटाच्या नेत्यांसमोर होता. निवडणूक झालीच तर ती दोन्ही काँग्रेसमध्ये होणार आणि काँग्रेस अनियमित कामाबद्दल आपले वस्त्रहरण करणार, हे माहिती असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरुवातीपासूनच सर्व मतभेद बाजूला ठेवून काँग्रेससोबत तडजोडीची भूमिका घेतली. जिल्हा बॅँकेची सत्ता सोडायची नाही, म्हणून राष्ट्रवादीने ‘गोकुळ’मध्ये काँग्रेसला बाय दिला.
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या माध्यमातून नवीन मोट बांधली होती. परंतु, एकाच निवडणुकीत त्यांनी तलवार म्यान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संजय मंडलिक यांनी संधी मिळते म्हटल्यावर कोणाचाही विचार न करता उडी मारली. आमदार चंद्रदीप नरके यांनीही ऐनवेळी रिंगणातून माघार घेऊन कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का दिला. अशा या नेत्यांच्या सोयीच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत असून, याचे पडसाद आगामी सर्वच निवडणुकीत दिसणार, हे मात्र निश्चित आहे.