Kolhapur: अल्पवयीन मुलीस प्रेमाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची भीती घालून ५१ तोळे दागिने लुबाडले
By उद्धव गोडसे | Published: June 8, 2024 05:29 PM2024-06-08T17:29:26+5:302024-06-08T17:29:43+5:30
परराज्यातील संशयिताचा शोध सुरू
कोल्हापूर : सोशल मीडियातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून एडिट केलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालत बनीदास (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) या संशयिताने ताराबाई पार्कातील अल्पवयीन मुलीकडून ५१ तोळे दागिने लुबाडले. हा प्रकार १९ एप्रिल ते २५ मे दरम्यान घडला. याबाबत संबंधित मुलीच्या वडिलांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, परराज्यातील संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ताराबाई पार्कातील एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर बनीदास नावाच्या एका तरुणाशी मैत्री झाली. त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर काही दिवसाच त्याने आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत मुलीकडे पैशांची आणि दागिन्यांची मागणी केली.
सासने ग्राऊंड आणि रेसिडेन्सी क्लब येथे भेटून तिच्याकडून दागिने घेतले. तिच्यासोबत काही फोटो काढले. सुरुवातीलाच १५ तोळ्यांचा नेकलेस मिळाल्यानंतर त्याने आणखी दागिने मिळविण्यासाठी तिच्यावर दबाव वाढवला. दागिने न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली.
बदनामीला घाबरून मुलीने वेळोवेळी घरातील २६ लाखांचे दागिने संशयिताला दिले. त्याच्याकडून दागिन्यांची आणि पैशांची मागणी वाढतच गेल्याने अखेर मुलीने घडलेला सर्व प्रकार घरात नातेवाईकांना सांगितला. त्यातून दागिन्यांच्या लुटीचा प्रकार उघडकीस आला. संबंधित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी संशयित बनीदास याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याच्या शोधासाठी एक पथक परराज्यात रवाना झाले आहे.